२०१४ मध्ये भाजपनेच ‘पीडीपी’शी युती करून सरकार बनवले होते. मग चार वर्षांनी ‘पीडीपी’ची गरज संपल्याने भाजपने काडीमोड घेतला आणि पुढच्याच वर्षी अनुच्छेद ३७० रद्द केला गेला! अनुच्छेद रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढत आहेत. तर त्यांना भाजपाचं आव्हान असणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची फेररचना करण्यात आली असून नव्या रचनेमुळे सात जागांची भर पडली आहे. यातील सहा जागा जम्मू विभागामध्ये तर एक जागा काश्मीर खोऱ्यामध्ये वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघांची संख्या ८३ वरून ९० झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागा असून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतील एकूण जागांची संख्या आता ११४ झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण मतदार ८७.०९ लाख असून त्यातील ३.७ लाख नवमतदार आहेत.