लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. तर २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातवा टप्पा पार पडणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत बॉलिवूडचे स्टार्सही उतरले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी कंगनाने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिच्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये कंगना कोट्यवधींची मालकीण असल्याचं समोर आलं आहे.
कंगनाचं शिक्षण किती झालं आहे?
कंगना रणौत हिमाचल प्रदेशातल्या मंडीचीच आहे. तिचा जन्म २३ मार्च १९८७ ला झाला आहे. तर कंगना बारावी उतीर्ण आहे. निवडणूक आयोगाला तिने जी माहिती दिली आहे त्यानुसार तिच्याकडे ९० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. सध्याच्या घडीला तिच्याकडे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. तसंच बँक खाती, शेअर्स, दागिने, जंगम मालमत्ता हे मिळून तिच्याकडे २८ कोटी ७३ लाख ४४ हजार २३९ रुपयांची मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्ता ही ६२ कोटी ९२ लाख ८७ हजार रुपये आहे. तसंच कंगनावर १७ कोटी ३८ लाख रुपयांचं कर्जही आहे असंही स्पष्ट झालं आहे.
हे पण वाचा- “भारताला हिंदू राष्ट्र बनवणार”, कंगना रणौतचं विधान; म्हणाली, “पाकिस्तानला इस्लामिक रिपब्लिक…”
कंगनाकडे ६ किलो ७०० ग्रॅम सोनं आणि दागिने आहेत. ज्याची किंमत ५ कोटींच्या घरात आहे. तर ६० किलो चांदी आहे या चांदीची किंमत ५० लाख रुपये आहे. तसंच कंगनाकडे जे हिऱ्यांचे दागिने आहेत त्यांची किंम ३ कोटींहून अधिक आहे अशीही माहिती प्रतिज्ञापत्रात समोर आली आहे.
कंगनाला आवडतात महाग कार्स
कंगनाला महागड्या कार्सची आवड आहे. तिने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तिच्याकडे BMW 7 सीरिज कार आहे तर दुसरी कार मर्सिडिझ बेंझ GLE SUV आहे या दोन कार्सची किंमत १ कोटी ५० रुपये आहे. कंगनाकडे ५० एलआयसी पॉलिसीज आहेत.
कंगनाकडे ५० एलआयसी पॉलिसी आहेत. या सगळ्या पॉलिसी ४ जून २००८ च्या दिवशी तिने काढल्या होत्या. तर कंगनाकडे मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड चे ९ हजार ९९९ शेअर्स आहेत. तर तिने १ कोटींपेक्षा जास्त रक्कम शेअर्समध्ये गुंतवली आहे.
कंगनाचा मुंबईत फ्लॅट आणि मनालीत बंगला
कंगनाचा मुंबईत पाच बीएचके फ्लॅट आहे. तर मनालीत तिचा बंगला आहे ज्याची किंमत २५ कोटी रुपये आहे. मुंबईतल्या पाच बेडरुमच्या फ्लॅटची किंमत १५ ते २० कोटींच्या घरात आहे. चित्रपट आणि जाहिरातींमधून तिला चांगलं उत्पन्न मिळतं.
गँगस्टर या सिनेमातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने तनू वेड्स मनू, क्वीन, तसंच इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऋतिक रोशनबरोबरच्या तिच्या अफेअरमुळेही ती चर्चेत आली होती. तसंच भारताला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर मिळालं असंही कंगना म्हणाली होती. त्यावरुनही चर्चा झाली होती.