संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पंजाब आणि गोव्यामध्ये अनुक्रमे ७० आणि ८३ टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. गोव्यामध्ये मतदारांनी विक्रमी मतदान केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गोव्यामधील निवडणुका अत्यंत शांततापूर्वक पार पडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. गोव्यामधील निवडणुकीमध्ये १०० टक्के वेबकास्टिंग करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

या निवडणुकीबाबत आपल्याला पूर्णपणे विश्वास असून पंजाबमध्ये काँग्रेसचे राज्य येणार असल्याचे कॅ. अमरिंदर सिंग यांनी म्हटले. दोन्ही राज्यातील मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदात्यांमध्ये सर्व वयोगटातील उमेदवारांचा समावेश होता. यावेळी सत्ता पालट होण्याची सर्व चिन्हे आपणास मतदानावेळी दिसली असे अमरिंदर सिंग म्हणाले. पंजाबमधील ११७ तर गोव्यातील ४० जागांसाठी हे मतदान झाले. केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या मोदी सरकारच्यादृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गोव्यात सत्ताधारी भाजपसमोर राजकीय पटलावर नव्याने आलेला आप व मगोप-गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्या आघाडीचे आव्हान आहे. राज्यात अकरा लाखांवर मतदार असून, १६४२ मतदान केंद्रे आहेत. या मतदानातून पाच माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य निश्चित होईल. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस यांच्यात राज्यात सत्तेसाठी चुरस आहे. त्यातच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा राज्यात परतणार काय याभोवतीच प्रचार केंद्रित झाला होता. गेल्या वेळी भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आघाडी होती. या वेळी भाजप स्वबळावर ३७  ठिकाणी काँग्रेस ३८ तर आप ३९ जागा लढवीत आहे.

तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) सहभागाने विलक्षण उत्कंठा निर्माण केलेल्या पंजाबमध्ये  ११७ जागांसाठी मतदान होत आहे. अकाली दल- भाजपकडून सत्ता हुसकावून घेण्यामध्ये ‘आप’ की काँग्रेस बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल. बदलांचे वारे घुमत असताना दलितांची मते ‘आप’कडे वळत असल्याचा अंदाज आहे. पंजाबात दलितांची तब्बल ३४ टक्के मते आहेत आणि देशातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. तसेच डेरा सच्चा सौदाने अकाली- भाजपला उघड पाठिंबा दिला आहे.  पंजाब आणि गोव्यातील मतमोजणी उर्वरित तीन राज्यांप्रमाणे ११ मार्च रोजी आहे.

Live Updates
14:11 (IST) 4 Feb 2017
गोवा : दक्षिण गोव्यात ५२ टक्के, उत्तर गोव्यात ५५ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यात ५३ टक्के मतदानाची नोंद झाली
12:08 (IST) 4 Feb 2017
पंजाब : सकाळी १०: ३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदानाची नोंद
12:08 (IST) 4 Feb 2017
क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि त्याची आई अवतार कौर यांनी जालंधरमध्ये मतदान केले
12:07 (IST) 4 Feb 2017
गोवा : मडगावमधील अनोख्या 'गुलाबी मतदान केंद्रा'वर मतदान करण्यासाठी महिलांची झुंबड
11:11 (IST) 4 Feb 2017
गोव्यात आमचीच हवा, आमचाच विजय होणार- श्रीपाद नाईक
11:10 (IST) 4 Feb 2017
पंजाब : मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले
11:09 (IST) 4 Feb 2017
पंजाब : सकाळी १०: ३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदानाची नोंद
08:05 (IST) 4 Feb 2017
पंजाबमध्ये ११७ तर गोव्यात ४० जागांसाठी मतदान
08:05 (IST) 4 Feb 2017
आज पंजाब आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान