Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर, इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. मात्र, इंडिया आघाडीने २९५ जागा मिळतील, असा दावा केला आहे. एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली होती. आता देशभरातील निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचा.

Live Updates

Election Results 2024, NDA Vs INDIA Alliance Vote Counting

08:01 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला रात्री ९ वाजे पर्यंत आलेल्या कलानुसार, २९२ जागांवर आघाडी मिळाली. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इतर पक्षाला ९ जागांवर आघाडी मिळाली आहे.

07:13 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : तुरुंगात असूनही अमृतपाल सिंग यांचा विजय

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. पंजाबमधील १३ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून तुरुंगात असलेले अमृतपाल सिंग लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

06:28 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : राहुल गांधी रायबरेली किंवा वायनाड सोडणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोनही मतदारसंघातून निवडून आले. मात्र, यानंतर आता रायबरेली किंवा वायनाड मतदारसंघ त्यांना सोडावा लागणार आहे. त्यामुळे ते रायबरेली आणि वायनाड यापैकी कोणता मतदारसंघ सोडतात हे याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

05:02 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचे आभार मानले. तसेच निकालानंतर भावूक देत म्हणाले, "भारतातल्या जनतेने दाखवलेलं प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद यासाठी मी सगळ्या देशाचा ऋणी आहे. आज मंगल दिवस आहे. या पावन दिवशी एनडीएचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे आणि आम्ही सरकार स्थापन करणार आहोत हे निश्चित झालं आहे", असं ते म्हणाले.

05:02 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : महायुतीच्या दिग्गज नेत्यांचा पराभव

भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचाही पराभव झाला आहे. नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचाही पराभव झाला आहे.

04:06 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत म्हटलं की, "पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो! इंडी आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. मी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो", असं त्यांनी म्हचलं.

04:05 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा सायंकाळी ७ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, राज्यात काँग्रेसने १३, ठाकरे गटाने १० आणि शरद पवार गटाने ७ अशा एकूण ३० जागांवर आघाडी घेतली. तर महायुतीत भाजपाने १०, शिंदे गटाने ६ जागांवर आघाडी घेतली. तसेच अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला. राज्यात महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये काहीसा बदल होऊ शकतो.

03:13 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. बीडमधील पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

03:13 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का, निम्या जागा राखण्यातही अपयश

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मोठं यश मिळालं. समाजवादी पक्षाची ३६ जागांवर आघाडी आहे. काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस मिळून इंडिया आघाडीला ४२ जागांची आघाडी आहे. भारतीय जनता पार्टी ३३ जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या ८० जागा आहेत. मात्र, त्यातील निम्याही जागा भाजपाला मिळवण्यात यश आलं नाही.

23:57 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला रात्री ९ वाजे पर्यंत आलेल्या कलानुसार, २९२ जागांवर आघाडी मिळाली. तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इतर पक्षाला ९ जागांवर आघाडी मिळाली आहे.

22:49 (IST) 4 Jun 2024
सुलतानपूरमधून मनेका गांधी यांचा पराभव

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र आता स्पष्ट होत आलं आहे. लोकसभा निवडणुकीत २०२४ च्या निकालात एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सुलतानपूरमधून मनेका गांधी यांचा पराभव झाला आहे.

21:14 (IST) 4 Jun 2024
"इमानदारीने देशाची सेवा करत राहणार": पंतप्रधान मोदी

"कोरोना काळात जगाला वाचवण्यात भारताचा मोठा वाटा आहे. आता तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जाणार आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांबरोबर मिळून काम करेल. आमच्याकडे थांबण्यासाठी थोडाही वेळ नाही. भारताच्या भविष्यासाठी उत्तर निर्णय घ्यायचे आहेत. आम्ही इमानदारीने देशाची सेवा करत राहणार", असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

21:06 (IST) 4 Jun 2024
"भाजपाला जेवढ्या जागा मिळाल्या, तेवढ्याही 'इंडिया'ला मिळाल्या नाही"; पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला जवळपास २९२ जागांवर आघाडी आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, "भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येऊन पण इंडिया आघाडीने भारतीय जनता पक्षाला मिळाल्या तेवढ्या जागा मिळू शकल्या नाहीत", असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.

21:03 (IST) 4 Jun 2024
"मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो"; पंतप्रधान मोदी

"माझ्या आईच्या निधनानंतर माझी पहिली निवडणूक होती. मात्र, देशातील माता भगिनींनी मला माझ्या आईची कमी जाणवू दिली नाही. एनडीएला तुम्ही आशीर्वाद दिला. मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो. आम्ही गेल्या दहा वर्षात १० मोठे निर्णय घेतले. राष्ट्र प्रथम ही भावना भारताला आत्मनिर्भर बनवणार, आमच्या पुढं विकसीत भारत हा संकल्प आहे", असं मोदी म्हणाले.

20:55 (IST) 4 Jun 2024
भाजपाचा विजय हा विकसीत भारताचा विजय : पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला जवळपास २९२ जागांवर आघाडी आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टीचा विजय हा विकसीत भारताचा विजय आहे. आजचा दिवस अतिशय मंगल दिवस आहे. काश्मीरच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. १९६२ नंतर पहिल्यांदा एखादं सरकार पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे", असं मोदी यांनी म्हटलं.

20:52 (IST) 4 Jun 2024
सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला.ओडीशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन करणार आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बोलत होते.

20:43 (IST) 4 Jun 2024
'एनडीएचं तिसऱ्यांदा सरकार बनणार', पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला जवळपास २९२ जागांवर आघाडी आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, देशाच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे मी जनतेचा आभारी आहे. देशातील जनतेने भाजपावर विश्वास ठेवला आहे. आज एनडीएला बहुमत मिळालं आहे. हा लोकशाहीचा विजय आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

20:30 (IST) 4 Jun 2024
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार : जे.पी.नड्डा

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. २०१४, २००९ नंतर आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने आशीर्वाद दिला आहे. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, असं भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलत होते.

20:16 (IST) 4 Jun 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात दाखल

दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.

19:33 (IST) 4 Jun 2024
शिवराज सिंह चौहान यांचा ८ लाखांहून अधिक मतांनी विजय

भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल ८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

18:11 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : टीएमसीचे शत्रुगन सिन्हा आघाडीवर

अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून ५९,४१० मतांनी आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात येथील निकाल स्पष्ट होणार आहे.

17:28 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड लाखांच्या फरकाने वाराणसीतून विजयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून विजय झाला आहे. मात्र, उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात चांगलीच टस्सल रंगली होती. पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मत मिळाली आहेत. तर अजय राय यांना ४ लाख ६० हजार ४५७ मते मिळाली आहेत. दीड लाखांच्या फरकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत.

15:36 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : राहुल गांधी तब्बल ४ लाख मतांनी रायबरेलीतून विजयी

लोकसभा निवडणुकीचे निकाल काही ठिकाणी समोर आले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येतील. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे.

15:05 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : मंडीमधून कंगना रणौत विजयी, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार कंगना रणौत या विजयी झाल्या आहेत. तर काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव झाला आहे.

14:51 (IST) 4 Jun 2024
दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या; एकीकडे एनडीएची तर दुसरीकडे इंडिया आघाडीचीही बैठक

लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याची माहिती आहे. तसेच जीतन राम मांझी यांनी अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली. उद्या दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे. तसेच इंडिया आघाडीचीही बैठक पार पडणार आहे.

13:59 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा चंद्राबाबू नायडू यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. टीडीपी लोकसभेच्या १६ जागांवर आघाडीवर आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या १३१ जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

13:55 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का, इंडिया आघाडीला ४२ जागांवर आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची ३६ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर असून भारतीय जनता पार्टी ३५ जागांवर आघाडीवर आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. एनडीए ३५ तर इंडिया आघाडीची ४२ जागांवर आघाडीवर आहे.

13:48 (IST) 4 Jun 2024
टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर

ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोल लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा २६,१९७ मतांनी आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात निकाल समोर येणार आहे.

13:41 (IST) 4 Jun 2024
Lok Sabha Election Result 2024 : मुंबईतून पीयूष गोयल आघाडीवर

केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया देत मुंबईतील जनतेचे आभार मानले आहेत. पीयूष गोयल हे सध्या १.२५ लाख मतांनी आघाडीवर आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, "आशीर्वाद दिल्याबद्दल उत्तर मुंबईतील मतदारांचे आभार मानायचे आहेत. भाजपाचा नक्कीच विजय होईल. उत्तर मुंबईची जागा जिंका आणि भारतात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन करेल, देशातील जनतेची सेवा करेल, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं.

13:27 (IST) 4 Jun 2024
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशमध्ये सपाची ३६ जागांवर आघाडी, भाजपा ३२ जागांवर आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची ३६ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर असून भारतीय जनता पार्टी ३२ जागांवर आघाडीवर आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात समोर येणार आहे. काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी सर्वच पक्षाचे उमेदवार आपलाच विजय होईल, अशी आशा व्यक्त तरत आहेत. तसेच एकीकडे भारतीय जनता पार्टी ४०० पारचा दावा करत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी २९५ जागा येतील असा दावा करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Loksabha Election Results 2024

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अपडेट

Story img Loader