LokPoll Survey Results on Maharashtra Elections: राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणाऱ्या लोकपोलनं केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलनं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील, मात्र त्या सत्तास्थापनेसाठी अपुऱ्या असतील, असंही या निष्कर्षांमध्ये दिसून आल्याचा दावा लोकपोलकडून करण्यात आला आहे.
कसा करण्यात आला सर्व्हे?
लोकपोलनं या निष्कर्षांबरोबरच हा सर्व्हे नेमका कसा करण्यात आला होता? याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रं निवडण्यात आली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. राज्यभरातल्या एकूण आकडेवारीप्रमाणेच महाराष्ट्रात विभागनिहाय निकाल कसा दिसू शकेल, याचाही अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
काय आहे Lokpoll चा निष्कर्ष?
लोकपोलनं त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतील. अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून ५ ते १८ जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात. या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल, असं दिसून येत आहे.
विभागनिहाय निकालांचे काय आहेत अंदाज?
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण आकडेवारीप्रमाणेच विभागनिहाय आकडेही या अंदाजामध्ये वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार, विदर्भातल्या ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २०, मविआला ४० ते ४५ तर इतर १ ते ५ असं वर्गीकरण असू शकेल. उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी महायुतीला २० ते २५, मविआलाही तेवढ्याच म्हणजे २० ते २५ व इतर ० ते २ जागा निवडून येऊ शकतात. ठाणे-कोकणमधील एकूण ३९ जागांपैकी महायुतीला २५ ते ३०, मविआला ५ ते १० तर इतर १ ते ३ आमदार निवड़ून येऊ शकतात.
या सर्व्हेतील अंदाजांनुसार, मुंबईतल्या ३६ मतदारसंघांपैकी १० ते १५ आमदार महायुतीचे, २० ते २५ आमदार मविआचे तर ० ते १ आमदार इतर पक्षांचे येऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ मतदारसंघांमध्ये महायुतीचे २० ते २५, मविआचे ३० ते ३५ तर १ ते ५ इतर आमदार येतील असा अंदाज आहे. तर मराठवाडा विभागातील ४६ मतदारसंघांपैकी १५ ते २० महायुतीचे, २५ ते ३० मविआचे तर ० ते २ इतर पक्षीय आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार ?
मतदारांसाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे?
दरम्यान, भाजपाच्या विरोधात मत जाण्यासाठी ग्रामीण भागातील असंतोष, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश, महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आणि बेरोजगारी या गोष्टींना मतदारांनी महत्त्व दिल्याचं सर्व्हेच्या निष्कर्षात म्हटलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असंही यात म्हटलं आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांचा मुद्दाही सर्व्हेमध्ये सहभाग घेणाऱ्या मतदारांसाठी महत्त्वाचा ठरला.
निवडणुकीच्या जवळपास दोन महिने आधी करण्यात आलेल्या या सर्व्हेमधून निवडणुकीनंतर काय चित्र असू शकेल, याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokpoll survey predicts mva government in maharashtra bjp led mahayuti in opposition pmw