मुंबई : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने सर्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून आयोगाच्या आडून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून आपल्याही बॅगांची तपासणी करण्यात आली असून, विरोधक केवळ राजकारण करीत असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला. त्यामुळे आयोगाच्या नेतेमंडळींच्या तपासणी मोहीमेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात असून अंतिम टप्प्यात सर्वच पक्षाच्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदी प्रमुख नेत्यांच्या राज्यभर प्रचारसभा होत आहेत. या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच यंदाच्या निवडणुकीतउमेदवार आणि मतदारांपर्यंत रसद पुरविली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. ही रसद नेतेमंडळींच्या माध्यमातून इच्छितस्थळी पोहचविली जात असल्याचे बोलले होते.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात

दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगास याबाबचा अहवाल पाठविला होता. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफएसटी) तैनात आहेत. या पथकांना पोलिसांची, सरकारी वाहने तसेच रुग्णवाहिकांबरोबरच नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकांनी सोमवारपासून नेत्यांच्या बॅगा, हेलिकॉप्टर, वाहनांच्या तपासणीचा धडाका लावला आहे.

सोमवारी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगेची वणी येथे तपासणी केली होती. त्यावर कोंडी करण्यासाठी आयोगाची ही एकतर्फी कारवाई सुरू असल्याचा दावा करीत विरोधकांनी महायुतीवर टीका सुरू केली आहे.

त्यानंतर आज दिवसभरात मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आयोगाने आपल्याही बॅगा तपासल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसिद्ध करीत विरोधकांच्या आरोपांची हवा काढली.

हेलिकॉप्टर तपासणीचे अधिकार नाहीत

● निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आयोगाने राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत. यात आतापर्यंत ५१९ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

● पथकांना नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा वाहन तपासण्याची परवानगी नाही. जर हेलिपॅडवर बॅगा किंवा हँडबॅग उतरवली असेल तर ती तपासण्याचे अधिकार आहेत. तसेच कोणाची अंगझडतीही घेता येत नाही. मात्र या कारवाईपासून केवळ पंतप्रधानांना सूट असून अन्य सर्व नेत्यांना समान न्याय दिला जात आहे. आयोग कोणावरही आकसाने कारवाई करीत नसल्याचे आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

ठाकरे यांचा ताफा रोखला

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे उद्धव ठाकरे यांचा ताफा निवडणूक पथकाने रोखला. त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांची तपासणीही केली. पोलिसांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करीत आहेत. ठाकरे यांची बॅग सलग दोन दिवस तपासण्यात आली होती.

काहींना तमाशा करण्याची सवय : भाजपचा टोला

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेचीही तपासणी झाली. पण त्यांनी कोणतीही ध्वनिचित्रफीत काढली नाही किंवा कोणावर आगपाखडही केली नाही. काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते, असा टोला भाजपने उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांचीही विमानतळावर तपासणी करण्यात आल्याच्या ध्वनिचित्रफिती बुधवारी प्रसारित करण्यात आल्या. फडणवीस यांच्या बॅगेची ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याची ध्वनिचित्रफीत भाजपने समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे. ‘संविधान केवळ दिखाव्यासाठी हाती घेऊन चालत नाही, तर संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात’, असे भाजपने म्हटल आहे.

Story img Loader