लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. दरम्यान, आज इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मित्र पक्षाचे आभार मानले आणि जनतेने दिलेल्या जनादेशाचा विचार केला जणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवादही साधला. या बैठकीत काँग्रेस पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विविध पक्षाचे ३३ नेते हजर होते. या बैठकीच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगे यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

“इंडिया आघाडीला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही भारतीय जनतेचे आभार मानतो. जनतेच्या जनादेशामुळे भाजपा आणि त्यांच्या द्वेषाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा जनादेश आहे”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

हेही वाचा >> NDA ची बैठक संपली, आजच करणार सत्तास्थापनेचा दावा; युतीच्या प्रमुख नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड

खरगे म्हणतात योग्य वेळ येऊ द्या…

“आम्ही लोकांना दिलेली आश्वासने आम्ही पाळू, या मुद्द्यावर आमचं पूर्णपणे सहमत झालेलं आहे. इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या फॅसिस्ट शासनाविरुद्ध लढत राहील. भाजपाचे सरकार सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू”, असा सूचक इशाराही त्यांनी दिली. म्हणजेच, इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये अंतर्भूत असलेल्या मूल्यांसाठी आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाबाबत समविचारी असलेल्या सर्व पक्षांचं इंडिया आघाडीत स्वागत आहे”, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी समविचारी पक्षांना आमंत्रण दिलं आहे. समविचारी पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा गाठता येईल का? याकडेही इंडिया आघाडीचं लक्ष आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“निवडणुकीतील निकाल हे पूर्णपणे मोदींच्या विरोधात आहेत. जनतेला भाजपाचं सरकार नको आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्ही योग्य पावलं उचलू, असं बैठकीत ठरवण्यात आलं आहे”, असं संजय राऊतांनी बैठकीनंतर सांगितलं.

बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने पक्षाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत बैठकीला उपस्थित होते. केंद्रात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यास उद्धव ठाकरेंचं समर्थन आहे. ते तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा करत आहेत, असं ठाकरे गटाच्या नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.