महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या दरम्यान विविध समीकरणं पाहण्यास मिळाली. निवडणूक निकाल १६ जानेवारीला जाहीर झाले. राज्यातल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपा-महायुतीने विजय मिळवला आहे. दरम्यान आज दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या आणि काय वक्तव्यं समोर आली ते आपण दिवसभरातल्या पाच वक्तव्यांमधून जाणून घेऊ. कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यावरुन संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी स्थानिक नेत्यांची राज ठाकरेंनी हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. यासह महत्त्वाची पाच विधान काय आपण जाणून घेऊ.
कल्याण डोंबिवलीतल्या युतीचा विषय चिंताजनक आहे-राऊत
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करुन कोणत्याही पक्षाचं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवलीचा विषय हा उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक आहेत. राज ठाकरेंनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे असंही संजय राऊत यांनी सुचवलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला कारण…- राजू पाटील काय म्हणाले?
“कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचे ५० नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे (शिंदे) ५३ नगरसेवक आहेत. गेल्या काही दिवसांपासून केडीएमसीत खेळ चालू होता. आकडेमोड, पळवापळवी सुरू होती. भविष्यात केडीएमसीतील समित्यांच्या निवडणुकीत गडबड होण्याची शक्यता होती. अशावेळी आम्ही कुठेतरी स्थिर राहावे, यासाठी शिवसेनेला (शिंदे) पाठिंबा दिला आहे.राज ठाकरेंना आम्ही केडीएमसीतील गणित सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे मनसेचे नेते राजू पाटील यांनी सांगितले.
मनसे शिवसेना युतीबाबत खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
“आज शिवसेनेने (शिंदे) आपल्या ५३ नगरसेवकांचा गट स्थापन केला. तसेच मनसेनेही त्यांच्या पाच नगरसेवकांचा गट स्थापन केला असून त्यांनी शिवसेनेला (शिंदे) समर्थन दिले. मनसेचा आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढलो होतो आणि केडीएमसीत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे.”मनसेने विरोधात निवडणूक लढवूनही त्यांच्याबरोबर युती का? या प्रश्नावर उत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, आम्ही निवडणूक वेगवेगळी लढली असली तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी जे बरोबर येतील त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोध नसेल तर विकासातही अडचण येत नाही. मनसेचे नेते राजू पाटील माझे मित्र आहेत. त्यांनी विकासासाठी महायुतीला समर्थन दिले आहे.
कल्याण डोंबिवलीतल्या समीकरणांवर काय म्हणाले बाळा नांदगावकर?
केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. तर, ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना-मनसेच्या या युतीवरुन जोरदार चर्चा रंगली आहे. आता, कल्याण डोंबिवलीतील या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक परिस्थिती काय आहे, हे मला माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोकं असतात, ते आघाडी-युती करत असतात. निशाणीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात, माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत, त्यांनी इंटर्नल ॲडजस्टमेंट केली असावी, सगळीकडे असंच चित्र दिसत असतं, असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी मनसे-शिवसेना युतीला एकप्रकारे खो दिलाय. वाजपेयी पंतप्रधान झाले होते तेव्हा शतप्रतिशत नारा त्यांनी दिला होता, अशात अनेक पक्ष हा नारा देतात. आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही बिनसले असेल तर माहिती नाही. कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेचं बिनसलं असावं, त्यामुळे तडजोडी झाल्या असाव्यात. काहीतरी घडलं असेल त्यामुळे हे होत असेल. काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात, तेव्हा काही बोलायच्या नसतात, असेही नांदगावकर यांनी म्हटले.
मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार – अमृता फडणवीस
मुंबईचा महापौर भाजपा होणार की शिंदेच्या शिवसेनेचा होणार असी जोरदार चर्चा राजकी वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर महापौर मराठी होणार की अमराठी यावरुन देखील चर्चा सुरु आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसचे यावेळी त्यांनी विविध विषयावंर भाष्य देखील केलं.
