मुंबईसह राज्यातल्या २९ पैकी २५ महापालिका भाजपा आणि महायुतीने जिंकल्या आहेत. ज्यानंतर राज्यभरात जल्लोष सुरु आहे. मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने ९० जागा मिळवल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने २८ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे मुंबईत महायुतीचा महापौर येणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान भाजपचे नेते अण्णामलाईंनी एक पोस्ट लिहिली आहे. निराधार आणि फूट पाडणाऱ्यांना जनतेने नाकारलं असं म्हणत अण्णामलाईंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
काय आहे अण्णामलाईंची पोस्ट?
महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेलं घवघवीत यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी कामगिरीवर आधारित शक्तिशाली जनादेश महायुतीला मिळाला आहे. गावखेड्यापासून ते महानगरांपर्यंत ‘ट्रिपल इंजिन’ नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा हा पुरावा आहे, येथील जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारले, असे म्हणत अण्णामलाई यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, ज्यांच्या धडाडीच्या नेतृत्वात प्रशासनाची व्याख्या प्रत्येक स्तरावर नव्याने लिहण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टीकोनातून प्रेरित होऊन महाराष्ट्र आता वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असेही अण्णामलाई यांनी म्हटलं आहे.
अण्णामलाई प्रचाराला आले होते तेव्हा काय घडलं?
मुंबईत प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे म्हटल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असून अण्णालाईंचं वक्तव्य तेच सांगते असा आरोप ठाकरे गटाकडून, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णामलाईंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं म्हटलं होतं. आता अण्णामलाईंनी त्यांच्या पोस्टमधून राज ठाकरेंना टोला लगावला आहे. दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अण्णामलाईंचा उल्लेख रसमलई असा केला होता आणि त्यांना शिवीही दिली होती. १५ जानेवारीला निवडणूक पार पडली आणि १६ जानेवारीला निवडणुकीचे निकाल लागले. मुंबई महापालिकेत राज ठाकरेंना अवघ्या सहा ठिकाणी यश मिळालं आहे. इतर महापालिकांमधल्या विजयांची संख्या यापेक्षाही कमी झाली आहे
