लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशातील मतदारांनी बहुमतापासून किंचितसे दूर ठेवले. भाजपाच्या २४० जागा निवडून आल्या आहेत. तर बहुमतासाठी त्यांना ३२ खासदारांची आवश्यकता आहे. निवडणूकपूर्व आघाडीनुसार जनता दल युनायटेड (जदयू) १२ खासदार, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) १६ खासदार, शिवसेना शिंदे गट ७ खासदार आणि बिहारमधील लोक जनशक्ती पार्टी (पासवान गट) ५ खासदार यांचा सरकार स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा असणार आहे. जदयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातही नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता त्यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर मिळाल्याचा दावा जदयूच्या पक्षाकडून केला जात आहे.

भाजपाला ६३ जागा का गमवाव्या लागल्या? प्रशांत किशोर यांनी सांगितली ‘ही’ कारणे

जदयूचे नेते केसी त्यागी यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (यू) नेते नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. मात्र नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. केसी त्यागी म्हणाले, “ज्या लोकांनी इंडिया आघाडीचे संयोजक पद नितीश कुमार यांना देऊ केले नाही, ते लोक आता पंतप्रधान पदाची प्रस्ताव देत आहेत. नितीश कुमार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आम्ही एनडीएबरोबर ठामपणे उभे आहोत.”

भाजपाप्रणीत एनडीएला सत्तास्थापनेसाठी काही जागा कमी पडाव्यात यासाठी इंडिया आघाडीकडून जदूय आणि टीडीपीशी संपर्क साधला जात आहे, अशी अटकळ बांधली जात आहे. यानंतर जदयूच्या नेत्यांनी याबाबत खळबळजनक दावा केला आहे. इंडिया आघाडीतील कोणत्या नेत्याने तुमच्याशी संपर्क साधून ही ऑफर दिली, असा प्रश्न विचारला असता केसी त्यागी यांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करण्यास नकार दिला.

नितीश कुमार होणार पंतप्रधान? बिहारचे मुख्यमंत्री पलटणार का लोकसभा निकालाची बाजी? नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत उडवली खिल्ली

केसी त्यागी पुढे म्हणाले, “काही नेत्यांनी थेट नितीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली. पण आम्हाला आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळालेल्या वागणुकीनंतर आम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही एनडीएत असून मागे जाण्याचा प्रश्नच येत नाही.” वास्तविक नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता. मागच्या वर्षी पाटणा येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक त्यांनी घेतली होती. पण नंतर जानेवारी २०२४ मध्ये अचानक त्यांनी इंडिा आघाडीतून बाहेर पडत एनडीएत प्रवेश कला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एक्झिट पोलच्या अंदाजांना साफ खोटे ठरवत इंडिया आघाडीने जोरदार कामगिरीचे प्रदर्शन केले. आघाडीने ५४३ पैकी २३४ जागांवर विजय मिळविला. तर एनडीएने २९३ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाला बहुमतापेक्षा ३२ जागा कमी मिळाल्या आहेत.