Goa Election : “गोव्यात आमच्याशिवाय सरकार नाही”; राष्ट्रवादीसोबत एकत्र लढण्याच्या घोषणेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे, असेही संजय राऊत म्हणाले

no government in Goa without us Sanjay Raut reaction after announcing to fight together with NCP

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न होते पण काँग्रेसची काही अडचण होती. आम्ही गोव्यात निवडणुकीच्या आधी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“प्रफुल्ल पटेल यांनी काय झाले आणि आम्हाला काय करायचे होते हे सांगितले आहे. पण काँग्रेसची काही अडचण होती. आम्ही गोव्यात निवडणुकीच्या आधी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला वाटत आहे की ते त्यांच्या ताकदीवर सरकार बनवू शकतात म्हणून त्यांना आमच्याकडून शुभेच्छा देतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीने गोव्यात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जेवढ्या जागांवर आम्ही उभे राहू तेवढ्या जिंकू. गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आया राम गया राम ही कल्पना आता हरियाणा नंतर गोव्यात दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाचा आणि गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्रातले सरकार पाहून येथील लोक आम्हाला संधी देऊन पाहतील,” असे संजय राऊत म्हणाले.

“उत्पल पर्रीकरांचा विषय भाजपाचा अंतर्गत विषय आहे. मनोहर पर्रीकर गोव्याचे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे लोकांची भावना आहे की त्यांच्या मुलाला तिकीट मिळावे. उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहणार असतील तर त्यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचे आम्ही लोकांना आवाहन केले आहे. दादरा नगर हवेलीची निवडणूकीत तीनवेळा पराभव झाल्यानंतर आम्ही चौथ्यांदा जिंकलो. गोव्यात आम्ही युतीच्या माध्यमातून लढलो. त्यावेळी आमच्या वाट्याला दुर्दैवाने अशा जागा आल्या जिथे शिवसेनेचे काम नव्हते. यावेळी आम्ही दहापेक्षा जास्त जागांवर लढत आहोत. आम्ही दोघे एकत्र आहोत त्यातून नक्कीच आम्हाला यश मिळेल,” असे राऊत म्हणाले.

“काँग्रेसच्या चिन्हावर निवडणून आलेल्या आमदारांवर काँग्रेसलाच खात्री नव्हती. ते एका रात्रीत सोडून गेले. त्यामुळे उत्पल पर्रीकर जिंकल्यानंतर भाजपामध्ये जाणार की नाही याबाबत चर्चा करु. वेगवेगळे लढल्याने फायदा होईल अशी काही लोकांच्या मनात भीती आहे. पण लोक शहाणपणाने मतदान करतील याची आम्हाला खात्री आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

“आमचा जाहीरनामा हा एकत्र असणार आहे. गोव्याच्या जनतेचे आवश्यक मुद्दे आम्ही थोडक्यात मांडू. उगाच चकचकीत रद्दीत जाण्यासाठी आमचा जाहीरनामा नसेल. लोकांना काय हवंय आणि आम्ही काय देऊ शकतो एवढंच आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून करु. सत्तेत आल्यानंतर ड्रग्जमाफियांबाबत सक्तीने निर्णय घेऊ. गोव्याच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर ड्रग्जमाफियांचे राज्य आहे. तिथे पोलीस जाऊ शकत नाही. त्यांना समर्थन देणारे लोक गोव्यात दिसणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No government in goa without us sanjay raut reaction after announcing to fight together with ncp abn

Next Story
UP Election : अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर अखिलेश यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “त्यांना प्राणी आवडतात त्यामुळे..”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी