केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भंडारा-गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी साकोली, भंडारा येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासन सांगितली, तर काँग्रेसवरही टीका केली. अमित शाह म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून देशाला एकसंध ठेवण्याचे काम केले. आंबेडकरांनीच या देशाला विश्वात सर्वात चांगले असे संविधान दिले. काँग्रेस पक्ष आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घरोघरी जाऊन मते मागत आहे. पण याच काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत पराभव करण्याचे काम केले.” पुढे अमित शाह यांनी आरक्षणाचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “पाच दशक सत्ता असतानाही काँग्रेसने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसने आंबेडकरांचा नेहमीच अपमान करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित पाच स्थानांना सन्मानित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. मात्र काँग्रेस पक्षाने खोटं-नाटं बोलून त्यांच्या विचारधारेला मातीमोल केले. भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर भाजपा आरक्षणाला समाप्त करेल, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जातो.”

“राहुल गांधी यांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे दोन टर्म पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. पण आमच्या बहुमताचा उपयोग आरक्षण हटविण्यासाठी केला नाही. आम्ही बहुमताचा उपयोग कलम ३७० हटविण्यासाठी जरूर केला. आमच्या बहुमताचा उपयोग तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यासाठी केला. राहुल गांधींनी अपप्रचार करणे बंद करावे. मी आज याठिकाणाहून जाहीर करतो की, जोपर्यंत भाजपा आहे, तोपर्यंत आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा इतर कुणालाही धक्का लावू देणार नाही”, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.

आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी फोडली नाही

महाराष्ट्रात एक नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्धी उरलेली काँग्रेस पार्टी आहे, अशी टीका अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला उबाठा गट आणि शरद पवारांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. आज भंडारा येथे अमित शाह यांनी पुन्हा एकदा याच टीकेचा पुनरच्चार केला. “उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात की, भाजपाने त्यांचा पक्ष फोडला. पण मी आज महाराष्ट्राला हे पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही त्यांचे पक्ष फोडलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना पक्ष फुटला, शरद पवारांच्या लेकीप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. तसेच दुसऱ्या बाजूला विदर्भाचा एक नेता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने पूर्ण असलेल्या काँग्रेसला अर्धे करण्याचे काम केले”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On dr babasaheb ambedkar jayanti union home minister amit shah spoke on reservation and criticized congress kvg