संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा विराजमान झाले. परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मराठीचा मुद्दा लावून धरल्यानंतर परभणीत मुस्लिम महापौर देण्याचा मार्ग शिवसेनेने अवलंबला आहे.
परभणीत गुरुवरी झाली निवडणूक
परभणीत महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांच्या मतानुसार महापौर म्हणून सय्यद इकबाल खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौर म्हणून शिवसेना मुस्लिम चेहरा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. सय्यद इक्बाल खाजा यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.
सय्यद इकबाल खाजा यांना संधी का देण्यात आली?
परभणी महापालिका निवडणुकीत एकूण ३० मुस्लिम निवडून आले आहेत. ठाकरेंच्या २५ नगरसेवकांपैकी १३ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. तर उर्वरित १२ हिंदू सदस्य आहेत. मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने अल्पसंख्याक समुदायाला महापौर करण्याचे पक्षाचे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.
परभणीत भाजपा विरोधात बसणार
परभणी महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची गरज होती. काँग्रेस आणि शिवसेनेकडे एकूण ३७ नगरसेवकांचे पाठबळ होते. तसेच एक अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याने देखील सेना-काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले. भाजपानेही सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवकांचं गणित जुळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला.
खासदार बंडू जाधव यांनी काय म्हटलं आहे?
चंद्रपूरमध्ये भाजपाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यावरुन वाद सुरु झाला होता. त्यामुळे परभणीत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार का? हा प्रश्न होताच. दरम्यान आमच्यात सामंज्यसाने गोष्टी होणं महत्त्वाचं होतं. काँग्रेस आणि आम्ही एकमताने महापौर आणि उपमहापौरपदाचा निर्णय घेतला अशी माहिती खासदार बंडू जाधव यांनी माध्यमांना दिली.
परभणी महापालिकेतील संख्याबळ कसं आहे?
एकूण जागा ६५
शिवसेना ठाकरे : २५
काँग्रेस : १२
भाजप : १२
राष्ट्रवादी काँग्रेस : ११
जनसुराज्य शक्ती : ३
यशवंत सेना : १
इतर : १

