काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी शेवटच्या टप्प्याचा प्रचार थंडावताना पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या १५ दिवसांत मोदींनी आपल्या भाषणात ‘मंदिर’ या शब्दाचा ४२१ वेळा उल्लेख केला. तर त्यांचे स्वतःचे ‘मोदी’ नाव ७५८ वेळा घेतले. तर मुस्लीम, पाकिस्तान आणि अल्पसंख्याकाचा २२४ वेळा उल्लेख केला. मात्र एकदाही त्यांनी महागाई, बेरोजगारी हे शब्द उच्चारले नाहीत, असा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबल्यानंतर खरगे पत्रकारांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी भाजपावर आरोप केला.

मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “मागच्या १५ दिवसांतील पंतप्रधान मोदींच्या प्रचाराकडे लक्ष दिले तर कळून येईल की, त्यांनी २३२ वेळा काँग्रेसचे नाव घेतले. स्वतःच्याच नावाचा ७५८ वेळा उल्लेख केला. तर ५७३ वेळा त्यांनी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा उल्लेख केला. पण त्यांनी एकदाही महागाई, बेरोजगारी यांचा उल्लेख केला नाही. याचा अर्थ पंतप्रधानांना महत्त्वाच्या मुद्दयावर लक्ष द्यायचे नसून त्यंना फक्त स्वतःबद्दलच प्रचारात बोलायचे होते.”

Lok Sabha Exit Poll 2024 Date: एक्झिट पोल कधी जाहीर होणार? वेळ, दिवस सगळं काही जाणून घ्या

जात आणि जातीय मुद्द्यांवर चिथावणीखोर विधाने करणाऱ्या पक्षांवर आणि नेत्यांवर निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते, मात्र निवडणूक आयोगान प्रचाराच्या काळात केवळ बघ्याची भूमिका घेतली, याबद्दल खरगे यांनी नाराजी व्यक्त केली.

४ जून रोजी जेव्हा निकाल जाहीर होईल, तेव्हा इंडिया आघाडीला बहुमत प्राप्त होईल, असा विश्वासही खरगेंनी व्यक्त केला. “आम्हाला विश्वास आहे की, यावेळी जनतेने नव्या सरकारसाठी मतदान केले आहे. इंडिया आघाडी नक्कीच सरकार स्थापन करेल. हे सरकार सर्वसमावेशक, राष्ट्रवादी आणि विकासाला प्राधान्य देणारे असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०६ सभा-रोडशो, ८० मुलाखती; पंतप्रधान मोदींच्या प्रचाराचा झंझावात थांबला

इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास पंतप्रधान पदासाठी कोणाचे नाव पुढे केले जाईल? असा प्रश्न विचारला असता खरगे म्हणाले की, आघाडी असल्यामुळे आम्ही कुणाचेही नाव आतापासूनच जाहीर करू इच्छित नाही. निकालानंतर सर्वांबरोबर बैठक घेतल्यानंतर त्यातून आघाडीचा नेता कोण असेल? याचा निर्णय घेतला जाईल.

“गांधींजींनी राजकारणात अंहिसेचे तत्व रुजवले. पण मोदीजींचे राजकारण द्वेषाने भरलेले आहे. आमचा भर कल्याणकारी योजनांवर असणार आहे. यावेळी लोक धर्म, जात, पंथ, श्रद्धा, लैंगिक भाष्य यामधील भेदाभेद बाजूला सारून संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ही निवडणूक कायम स्मरणात राहिल. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने अनेकवेळा लोकांची दिशाभूल केली. आम्ही मात्र जनतेच्या मुद्द्यांवर ठाम राहिलो”, असेही मल्लिकार्जून खरगे म्हणाले.