लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराने वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी गेल्या दोन दिवसांत जवळपास पाच सभा घेतल्या आहेत. आज लातूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची लातूरमध्ये सभा पार पडली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. “देशाला लुटण्याची इंडिया आघाडीची योजना असून पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवण्याचा प्लॅन विरोधकांचा आहे. सर्वसामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर आहे”, अशी खोचक टीका मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेत बोलत असताना लातूरचा शैक्षणिक क्षेत्र असा उल्लेख केला. शैक्षणिक क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या लातूरकरांना नमस्कार, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या धरतीवर प्रेरणा मिळते. तसेच ही निवडणूक सुधाकर शृंगारे यांना खासदार करण्यासाठी नाही तर त्यापेक्षा या निवडणुकीचे ध्येय मोठे आहे. त्यामुळे सुधाकर शृंगारे यांना संसदेमध्ये पाठवून माझे हात आणखी मजबूत करण्यासाठी मी आज आशीर्वाद घेण्यासाठी लातूर मध्ये आलो असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”

“इंडिया आघाडीने दरवर्षी एक पंतप्रधान, दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान, तिसऱ्या वर्षी तिसरा पंतप्रधान, असे ठरवले आहे. मी जेव्हा एक भारत, श्रेष्ठ भारत बोलतो, तेव्हा काँग्रेसच्या राजकुमाराला ताप चढतो, एक भारत श्रेष्ठ भारत बोलल्यावर राहुल गांधींना आवडत नाही. देशाला तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहणाऱ्या या लोकांची आता पंतप्रधानपदालाही विभागायचे काम करण्याची योजना आहे. याचा अर्थ बारीबारीने देशाला लुटण्याचे काम काँग्रेस करणार आहे. या अशा लोकांना संधी दिली नाही पाहिजे. आता आपण पुन्हा एकदा देशाला अस्थिरतेकडे घेऊन जाऊ शकत नाही”, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

“काँग्रेसने सर्वसामान्य लोकांना लुटण्याची योजना आखली आहे. काँग्रेस देशवाशीयांच्या कमाईचा रोड मॅप तयार करुन ते तुमच्या प्रॉपर्टीवर कब्जा करतील आणि ती प्रॉपर्टी काँग्रेस त्यांच्या व्होट बँकेला वाटण्याचे काम करेल. त्यामुळे तुम्ही तुमची संपत्ती काँग्रेसला देणार आहात का? जनतेच्या मेहनतीची संपत्ती काँग्रेसला लुटू देणार आहात का? सर्वसामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर आहे. या काँग्रेसने देशाला गरिबीशिवाय काहीही दिले नाही. काँग्रेसच्या काळात लोकांना मुलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत”, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.