देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून दोन टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर ७ मे रोजी मतदान पार पडेल. त्यामुळे सर्व पक्षांनी सध्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काल कोल्हापुरात तर आज सोलापूर, सातारा आणि पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. सोलापूरमधील भाजपा उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ सोलापुरात घेतलेल्या सभेत मोदी यांनी आरक्षणावर भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकांचं आरक्षण काढून घेतील. भाजपाला संविधानात त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घेण्यासाठी लोकसभेच्या ४०० जागा जिंकायच्या आहेत. असे आरोप विरोथकांकडून होत आहेत. या आरोपांना मोदी यांनी सोलापूरच्या सभेतून उत्तर दिलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे या समाजातील लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. ते आता काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला कंटाळले आहेत. त्यामुळेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लोक थोडेसे गडबडले आहेत, गोंधळले आहेत. त्यातून ते लोक आता खोट्या अफवा पसरवू लागले आहेत. ते आता म्हणत आहेत की आम्ही (भाजपा) संविधान बदलू, आम्ही आरक्षण संपवू. काँग्रेसवाले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी याआधी देखील सांगितलं आहे की आज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी वाटलं तर तेसुद्धा आपल्या देशातलं आरक्षण संपवू शकत नाहीत, त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच येत नाही.

हे ही वाचा >> “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करत म्हणाले, भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे. त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचीदेखील तयारी आहे. त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपवल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल. त्यांनी याआधीदेखील सत्तेसाठी देशाचं विभाजन केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi says even dr babasaheb ambedkar cant change constitution of india asc
First published on: 29-04-2024 at 20:33 IST