Babita Phogat Reaction on Vinesh Phogat : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जागतिक दर्जाची कुस्तीपटू विनेश फोगट उतरली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थोडक्यासाठी बाद झालेल्या विनेशने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिला उमेदवारी जाहीर केली आहे. विनेश फोगटच्या या राजकीय निर्णयामुळे फोगट कुटुंबियातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. दी प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत भाजपाच्या बबिता फोगट यांनी विनेशविरोधात प्रचार करण्यास तयार असल्याचं
म्हटलं आहे.
विनेशची चुलत बहीण आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या बबिता फोगट यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप पोस्ट केली, ज्यात त्यांनी तिच्या चुलत बहिणीविरुद्ध भाजपाचा “स्टार प्रचारक” म्हणून प्रचार करण्यासाठी जुलाना येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
“गेल्या १० वर्षात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा आणि क्रीडापटूंसाठी जेवढे काम केले आहे, त्याची खेळाडूंनी कल्पनाही केली नसेल. प्रत्येकजण कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्यास स्वतंत्र आहे. पण सतत भाजपा आणि मोदींना गोत्यात आणणे योग्य नाही”, असं बबिता यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
तर मी तिच्याविरोधात प्रचार करणार
बबिता यांनी द प्रिंटला सांगितले की तिने चरखी दादरी येथून २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपाची उमेदवार म्हणून लढवली होती आणि यावेळी ती पक्षाच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहे. त्यांना उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सहप्रभारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. “मी जुलाना येथे जाऊन विनेशच्या विरोधात प्रचार करावा अशी पक्षाची इच्छा असेल, तर मी भाजपाची शिस्तबद्ध सदस्य म्हणून निर्देशांचे पालन करीन”, असं बबिता यांनी स्पष्ट केलं.
साक्षीने घेतली विनेश आणि बजरंग यांच्यापासून फारकत?
गेल्या वर्षी कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंग आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. परंतु, आता विनेश आणि पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने साक्षीने त्यांच्याबरोबर फारकत घेतली असल्याचं बबिता यांचं म्हणणं आहे.
साक्षीने आता बबिताची मोठी बहीण गीता फोगट हिच्यासोबत कुस्ती चॅम्पियन्स सुपर लीग सुरू करण्यासाठी एकत्र काम सुरू केले आहे. तर, बजरंग पुनिया हे महावीर फोगट यांचे जावई आहेत. निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना विनेशने तिचे काका महावीर फोगट आणि इतर बहिणींची मते विचारात घेतली नव्हती, असंही बबिता म्हणाल्या.