मुंबई सह राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात विजयी उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. मुंबईसह उपनगरातील महापालिकांमध्ये नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असून ठाकरेंचे ४ ते ५ नगरसेवक फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण डोंबिवलीत चार आणि मुंबईत एक असे नगरसेवक फुटल्याची ही चर्चा आहे. दरम्यान वॉर्ड क्रमांक १५७ च्या नगरसेवक डॉ. सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ येणार नाही असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
डॉ. सरिता म्हस्केंबाबत काय म्हणाले अनिल परब?
मुंबईतील नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या फुटीसंदर्भातही अनिल परब यांनी भूमिका मांडली. नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील १ महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे, डॉ. सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. पुढील १ महिना त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतील, पण ती वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
६५ नगरसेवकांच्या गट नोंदणीला सरिता म्हस्के गैरहजर
मुंबईत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्या. तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले. त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने सस्पेन्स वाढला. मात्र आता अनिल परब यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई महापालिकेतला निकाल काय? कुठल्या पक्षाला किती जागा?
भाजपा – ८९
शिवसेना ठाकरे गट – ६५
शिवसेना – २९
काँग्रेस – २४
मनसे – ६
एमआयएम- ८
एनसीपी – ३
एसपी – २
एनसीपी शप – १
एकूण- २२७
२२ जानेवारीला महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत
राज्यातील २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
