उत्तर प्रदेशच्या रायबरेली या मतदारसंघातून राहुल गांधी तर अमेठीमधून किशोरी लाल शर्मा निवडणुकीसाठी उभे आहेत. काँग्रेसचे हे दोन पारंपरिक मतदारसंघ असून २०१९ साली भाजपाच्या स्मृती इराणी यांनी येथून राहुल गांधींचा पराभव केला होता. तर रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी विजय मिळविला होता. मात्र यंदा त्या निवडणुकीला उभ्या नाहीत. त्यांच्याऐवजी राहुल गांधी येथून निवडणूक लढवित आहेत. या दोन्ही मतदारसंघात प्रियांका गांधी वाड्रा जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी ठिकाठिकाणी चौक सभा घेत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच अमित शाह यांनी केलेल्या एका आरोपला उत्तर दिले.

तुम्ही महिलांवर पाळत का ठेवता?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या थायलंड दौऱ्याचा मध्यंतरी उल्लेख केला होता. यावर बोलत असताना त्या म्हणाल्या, अमित शाह खूप माहिती बाळगून आहेत. महिलांची माहिती विशेषकरून त्यांच्याकडे आहे. महिला कुठे जातात, कुणाला भेटतात? ही सर्व माहिती ते ठेवतात. त्यांनी माझ्या थायलंड भेटीचा उल्लेख केला. हो, मी थायलंडला गेले, तिथे माझी मुलगी राहते, तिला भेटण्यासाठी मी गेले. पण अमित शाह यांनी सांगावे, त्यांना ही माहिती कुठून मिळाली. जर त्यांना सर्व माहितीच आहे, मग ते खोटं का बोलतात?

अमेठीतही स्मृती इराणी यांच्याविरोधात प्रियांका गांधी वाड्रा यांनी शड्डू ठोकला आहे. यावेळी त्यांनी स्मृती इराणींवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, अमेठीशी वर्षानुवर्ष आमचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. इथल्या लोकांच्या मनात वसण्यासाठी स्मृती इराणी यांना ४० वर्ष लागतील. माझ्या वडीलांप्रमाणे त्या इथल्या लोकांची सेवा करण्यासाठी आलेल्या नाहीत.

रायबरेलीमध्ये अमित शाह यांनी आपले उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा प्रचार करत असताना सोनिया गांधी यांच्यावर कडाडून टीका केली होती. सोनिया गांधी यांनी खासदार निधीचा गैरवापर केला, असे ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांची पाकिस्तान, कलम ३७० आणि अयोध्येतील राम मंदिराबाबतची भूमिका कशी चुकीची आहे, यावरही ते बोलले.

राहुल गांधी हे पहिल्यांदाच रायबरेली मतदारसंघातून लढत आहेत. याआधी इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी याठिकाणाहून प्रतिनिधित्व केलेले आहे. केरळच्या वायनाड लोकसभेतून राहुल गांधी यांनी २०१९ साली विजय मिळविला होता. याहीवर्षी त्यांनी केरळमधून निवडणूक लढविली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले की, राहुल गांधींचा वायनाडमधून पराभव होणार. त्यानंतर काँग्रेस पक्षाने राहुल गांधींना रायबरेलीमधून निवडणूक लढविण्यासाठी गळ घातली.