scorecardresearch

पंजाब विधानसभेची निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला

मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.

election commission of india (photo - pti)
भारतीय निवडणूक आयोग (फोटो पीटीआय)

नवी दिल्ली : राज्य सरकार तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेली मागणी मान्य करून, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात होणारी निवडणूक गुरू रविदास जयंतीच्या कारणास्तव १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सोमवारी घेतला.

गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाणार असल्याने ते १४ फेब्रुवारीला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, भाजप व त्याचे मित्रपक्ष, बसप व इतर संघटनांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार, ही निवडणूक आता २० फेब्रुवारीला होईल, असे आयोगाने एका निवेदनात सांगितले. ही तारीख उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्याशी जुळणारी आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका तसेच पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर २०१३ मध्ये मिझोराममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही तारखा आयोगाने बदलून नोव्हेंबरमध्ये केल्या होत्या. एप्रिल २०१४ मध्ये मिझोराममधील एका पोटनिवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले होते, तसेच अशाच कारणांसाठी मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.

राजकीय पक्षांकडून स्वागत 

निवडणुकीची तारीख बदलल्यामुळे गुरू रविदास यांच्या अनुयायांना वाराणसी येथे कार्यक्रमाला जाणे शक्य होईल, असे सांगून पंजाबमधील राजकीय पक्षांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, भाजपचे नेते सोम प्रकाश व आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते हरपालसिंग चीमा यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ ( Punjab-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab assembly elections on 20th february instead of 14th zws

ताज्या बातम्या