पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती येऊ लागलेत. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला प्राथमिक मतमोजणीमध्ये मोठी आघाडी मिळाली असून आपने बहुमताचा आकडाही ओलांडल्याचं चित्र मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये दिसून येतंय. त्यामुळे काँग्रेसच्या हातून हे राज्यही जाणार असं चित्र दिसत आहे. एकीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे मागील काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये चरणजीत सिंग चन्नी हे बकरीचं दूध काढताना दिसत आहेत. नक्की हा व्हिडीओ काय आहे आणि तो का व्हायरल होतोय हे जाणून घेऊयात…

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी दोन दिवसांआधी चरणजीत सिंग चन्नी यांनी मंगळवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हाच तो व्हायरल झालेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओला त्यांनी केवळ बालाओ गाव, बदाऊर अशी कॅप्शन दिलीय. हा व्हिडीओ त्यांनी नेमका कोणत्या हेतूने पोस्ट केला याबद्दल मतमतांतरे आहेत. पण या व्हिडीओत ते गुडघ्यावर बसून एखाद्या शेतकऱ्याप्रमाणे बकरीचं दूध काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री अगदी सवयीचं असल्याप्रमाणे बकरीचं दूध काढताना दिसतायत. चरणजीत सिंग चन्नी हे थेट एका बाटलीमध्ये बकरीचं दूध काढताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर वेगवेगवळ्या कमेंट्स आल्या आहेत. काहीजणांनी चरणजीत सिंग चन्नी यांना या कामामधील तज्ज्ञ म्हटलं आहे तर काहींनी त्यांना टोला मारताना १० मार्चनंतर म्हणजेच निवडणुकीच्या निकालानंतर हेच करावं लागणार आहे असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ चरणजीत सिंग चन्नी यांनी पोस्ट करण्याच्या एक दिवस आधीच एग्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.