पंजाबचे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी त्यांच्या खास शैलीत पंजाबमधील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. विनोदी कलाकार म्हणून लोकप्रिय असलेले भगवंत मान आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. मात्र अद्याप त्यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे विनोदी शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना आपल्याला कोणी ‘विनोद’ म्हणून घेऊ नये, यासाठी भगवंत मान प्रयत्न करत आहेत.

एका वाक्यात विरोधकांना घायाळ करण्याची किमया भगवंत मान यांनी साधली आहे. भगवंत मान विनोदी अंगाने सत्ताधारी भाजप आणि अकाली दलाच्या नेत्यांच्या टोप्या उडवत होत्या. अनेक सत्तापदे घरातच असलेले बादल कुटुंब सध्या भगवंत मान यांचे सॉफ्ट टार्गेट आहे. ‘बादल यांचे पंजाबमधील सर्वच गोष्टींवर वर्चस्व पाहता आपल्याला BadalBadal@Badal.com असा ई-मेल ऍड्रेस वापरावा लागेल,’ अशी कोपरखळी भगवंत मान यांनी मारली आहे.

प्रकाश सिंग बादल यांच्याकडे पंजाबचे मुख्यमंत्रीपद आहे. तर प्रकाश सिंग बादल यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल पंजाबचे उपमुख्यमंत्री आहेत. प्रकाश सिंग बादल यांच्या पत्नी हरसिम्रत कौर या केंद्रात मंत्री आहेत. तर हरसिम्रत यांचे भाऊ बिक्रम सिंग मजिठीया पंजाबचे मंत्री आहेत. एकाच घरात इतकी मंत्रीपदे असल्याने बादल यांच्या मंत्रिमंडळाचा उल्लेख किचन कॅबिनेट म्हणून केला जातो. यावर निशाणा साधताना ‘गुगल जर बादल यांच्या मालकीचे असते, तर त्यालाही गुगल बादल गुगल असे म्हटले गेले असते,’ असे भगवंत मान यांनी म्हटले.

आम आदमी पक्षाने पंजाब निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीतपदासाठी उत्सुक आहेत. आपणच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न मान यांनी अनेकदा केला आहे. भगवंत मान यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. मागील वर्षी संसद आणि आसपासचा परिसर मोबाईलच्या माध्यमातून दाखवणाऱ्या भगवंत मान यांच्यावर मोठी टीका झाली होती. संसदेची सुरक्षा धोक्यात घातल्याबद्दल भगवंत मान टिकेचे धनी ठरले होते.