कट्टरपंथीयांच्या मतांसाठी फुटीरतावादी खलिस्तानी घटकांना चुचकारत असल्याचा आरोप

‘दहशतवादाच्या काळ्या दिवसांना पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्या कट्टरतावादी घटकांना अरिवद केजरीवाल बळ देत आहेत. कट्टरतावादाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ नका. शांतता गमाविणे पंजाबला परवडणारे नाही..’

पंजाब जिंकण्याच्या आशेने प्रचाराचा धडाका उडवून देणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे हे वक्तव्य संगरूरमधील मौर मंडी येथील. याच गावात मंगळवारी रात्री काँग्रेसच्या सभेनंतर वाहनात स्फोट झाला होता आणि त्यात सहा जणांना जीव गमवावा लागला. अनेकांच्या मते, कित्येक वर्षांनंतर निवडणुकीमध्ये प्रथमच अशा तीव्रतेचा हिंसाचार झाला आहे. तोच धागा पकडून खलिस्तानवादी म्हणजे फुटीरतावाद्यांशी केजरीवालांनी संधान साधल्याचे राहुल सुचवू पाहत आहेत. राहुल भले प्रथमच उघडपणे बोलले असतील, पण पंजाबातील अनेक राजकीय निरीक्षकांच्या, सुरक्षा यंत्रणेतील काही जणांच्या मनात तसाच संशय आहे. खलिस्तानी घटकांचे तुष्टीकरण करून केजरीवाल विस्तवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया पंजाब पोलिसांतील एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

दहा वर्षांच्या सत्तेमुळे अकाली दलाविरुद्ध जनमत गेल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. जनतेमधील असंतोषाचा आणि पोकळीचा अचूक फायदा घेत असलेले केजरीवाल धोकादायक पद्धतीने कट्टरतावादी घटकांना चुचकारत असल्याचे अनेक निरीक्षकांचे म्हणणे आहे. १९८४च्या दंगलींच्या दोषींना शिक्षा करण्याचा आणि पवित्र ‘गुरू ग्रंथसाहिब’च्या अवमानाच्या घटनांवरच त्यांचे भाषण रचलेले असते. पंजाब्यांच्या या संवेदनशील मुद्दय़ांवरील त्यांची आक्रमकता एखादा शीख नेत्यालाही लाजविण्याइतपत नाटय़मय असते. पण त्याबद्दलचा संशय अधिक वाढला तो केजरीवालांनी ‘खलिस्तानी लिबरेशन फ्रंट’ या फुटीरतावादी संघटनेचा माजी म्होरका गुरिवदरसिंग यांच्या घरी मुक्काम केल्यापासून. दंगलींच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले गुरिवदरसिंग हे सध्या ब्रिटनमधून फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घालत असल्याचे सांगितले जाते. पण हे आरोप ‘आप’ने उडवून लावलेत. याउलट गुरिवदरसिंग आणि मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यातील एका जुन्या बठकीची छायाचित्रेच ‘आप’ने प्रकाशित करून अकाल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

पण या घटनेने केजरीवाल आणि कट्टरतावादी घटकांमधील कथित संबंधांची जोराने चर्चा चालू झाली आहे. अर्थात, त्यास अकाली दल आणि काँग्रेस अधिकच खतपाणी घालत आहे. खरे तर पारंपरिक कट्टर शीख मंडळी (पंथिक) ही अकाली दलाची मतपेढी. ‘पंथ खतरे में..’ या एका घोषणेने कट्टर मते अकाल्यांना मिळायची. पण आता अकाली दल व कट्टरपंथीयांमध्ये बरेच अंतर पडले आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचे प्रस्थ वाढल्यापासून अकाली दल कट्टरतावाद्यांपासून ‘सुरक्षित’ अंतर ठेवू लागला. त्यामुळेही चिडलेले कट्टरपंथीय ‘आप’च्या मागे जात असल्याचे चित्र आहे. काँग्रेसने शिखांचे शिरकाण केल्याचे आम्ही मुलांच्या मनावर लहानपणापासूनच िबबवत असल्याची टिप्पणी एका धर्मगुरूने सहजपणे बोलताना केली होती. त्यामुळे अशा ‘कलंकित’ काँग्रेसऐवजी कट्टरपंथीय ‘आप’कडे झुकल्याचे चित्र आहे.

संशयाच्या सुया..

  • खलिस्तानी लिबरेशन फ्रंट (केएलएफ) या फुटीरतावादी संघटनेचा माजी प्रमुख गुरिवदर सिंग याच्या घरी अरिवद केजरीवालांचा मुक्काम. दहशतवाद शिखरावर पोचलेला असतानाच्या काळामध्ये शीख व िहदूंमध्ये दंगे घडविण्याचे आरोप गुरिवदरसिंगवर होते. सध्या ते ब्रिटनमधून खलिस्तानी चळवळीच्या कारवाया करीत असल्याचे सांगितले जाते.
  • संगरूर जिल्ह्य़ातील मौर मंडीमध्ये मंगळवारी रात्री काँग्रेसच्या सभेनंतर कार बॉम्बस्फोट झाला. त्यात सहा जणांचा बळी गेला. कित्येक वर्षांनंतर निवडणुकीत अशा पद्धतीने बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
  • ‘आप’च्या प्रचारासाठी कॅनडा व युरोपामधील पंजाबी ‘एनआरआय’ची फौजच आली आहे. त्यातील काही जणांचा खलिस्तानी घटकांशी निकटचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या श्रीमंत मंडळींकडून पशांचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू असल्याचाही दावा केला जात आहे.