पंजाब विधानसभा निवडणूक निकालाआधीच आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी डीजे पार्टीची तयारी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ११ मार्चचा सकाळी सात वाजता म्हणजेच मतमोजणी सुरु होण्याच्या काही तास आधीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत आपचे नेते विजयाचा आनंद साजरा करत असल्याचे दिसते. तसेच पंजाबचे प्रभारी संजय सिंह हे नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही १०० जागांवर विजय मिळणार असल्याचे सांगत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडीओ आमचाच असल्याचे संजय सिंह यांनी मान्य केले आहे. मात्र, तो ४ फेब्रुवारीचा म्हणजेच मतदान संपल्यानंतरचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या व्हिडीओत संजय सिंह हे आपले सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांसह गाणे गात असल्याचे दिसत आहेत. तसेच खासदार भगवंत मान यांच्यासोबत मोबाईलवर बोलत असल्याचे दिसत आहे. जवळपास आठ मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. त्यात संजय सिंह हे १०० जागांवर विजय मिळणार असून, मान हे पंजाबचे भावी मुख्यमंत्री आहेत, असे सांगताना दिसून येत आहेत. मोबाईलवर ते बोलत असताना, आम आदमी पक्षाला १०० जागांवर विजय मिळेल. तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असे भगवंत मान यांना विचारताना ऐकायला मिळत आहे. तर जलालाबाद येथून मान हे ५० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळणार आहे, असेही सांगत आहेत. त्यावर निकालानंतरच मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी करणार असल्याचे मान यांनी समोरून सांगितल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.

हा व्हिडीओ आपच्या एका कार्यकर्त्यानेच लीक केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर संजय सिंह यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ ४ फेब्रुवारीचा आहे. मतदान झाल्यानंतर आम्ही नेते आणि कार्यकर्ते आपापसात थट्टामस्करी करत होतो. ही कोणती तालिबानी पार्टी नाही. थट्टामस्करी करण्याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांत आपने विजयाचा दावा केला होता. १०० जागा जिंकू, असा अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व नेत्यांचा अंदाज होता. मात्र, पंजाबमध्ये आपला केवळ २० जागा जिंकता आल्या. काँग्रेसने ७७ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. तर १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या अकाली दल आणि भाजप आघाडीला अवघ्या १८ जागांवर विजय मिळाला आहे.