Live

Narendra Modi jalandhar rally: काँग्रेस म्हणजे बुडते जहाज; नरेंद्र मोदींचा घणाघात

पंजाब हा भारताचा अभिमान असल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जालंधरमध्ये सभा घेतली.

काँग्रेस हा पक्ष सध्या शेवटच्या घटका मोजत असून सत्तेविना या पक्षाची अवस्था पाण्याशिवाय तडफडणा-या माशासारखी झाल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जी बोट बुडाली आहे, ज्या बोटीत आता काहीच उरले नाही अशा बोटीमध्ये पंजाबची जनता पाय ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंजाबमध्ये अकाली दल – भाजप युतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

पंजाबमधील जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रचारसभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पहिल्याच सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पंजाबमधील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली असून यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. पंजाब ही वीरांची भूमी आहे. पंजाबची आन बान आणि शानमुळे देशाची मान अभिमानाने उंचावते असे सांगत मोदी म्हणाले, काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी पंजाबमधील तरुणांची प्रतिमा मलिन केली. अशा लोकांना पंजाबच्या जनतेने अशी शिक्षा द्यावी की ते पुन्हा कधी पंजाबवर बोट ठेवणार नाही.

उत्तरप्रदेशमधील काँग्रेस – समाजवादी पक्षाच्या आघाडीचाही त्यांनी समाचार घेतला. काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी गावागावात रथयात्रा काढली. समाजवादी पक्षावर टीका केली. पण तरीही जनता स्वीकारत नसल्याचे दिसताच त्यांनी समाजवादीशी हातमिळवणी केली असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस स्वतःला वाचवण्यासाठी निवडणुकीत स्वतःच्या पदरी जे पडेल ते घेऊन पुढे जात असल्याचे मोदींनी नमूद केले.

पंजाबमधील जनतेला प्रकाशसिंग बादल हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी हवे आहेत. त्यांनी नेहमी पंजाबच्या भल्यासाठी काम केले आहे असे सांगत मोदींनी अकाली दलाच्या नेत्यांचे कौतुक केले. पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, पण त्यांनी अजून ना पक्ष बदलला ना त्यांचे मन बदलले असे त्यांनी आवर्जून सांगितले. या देशाने गेल्या ७० वर्षात विनाशाचे राजकारण बघितले आहे. आता या विकासाचे राजकारण करा असा आवाहन त्यांनी विरोधकांना केले. काँग्रेसच्या काळात ४८ वर्षांपासून वन रँक वन पेन्शनवर तोडगा निघाला नाही. पण आम्ही सत्तेवर येताच हा प्रश्न निकाली काढला असा दावाही मोदींनी केला. गेल्या ७० वर्षात कमावलेले पैसे आता बुडत असल्याने काही लोकांची चिंता वाढली असा चिमटाही त्यांनी काँग्रेसला काढला. देशातील जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केले. त्याचा सर्वाधिक आनंद पंजाबच्या जनतेला झाला असेही मोदी म्हणालेत. गेल्या तीन महिन्यांपासून मी भ्रष्टाचाराविरोधात लढा देत असल्याने माझ्यावरही अन्याय झाला. पण मी मोदी आहे, या अन्यायासमोर मी शरणागती स्वीकारणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Live Updates
10:38 (IST) 27 Jan 2017
पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, पण त्यांनी अजून ना पक्ष बदलला ना त्यांचे मन बदलले – मोदी
10:37 (IST) 27 Jan 2017
जी नाव बुडाली आहे, ज्या बोटीमध्ये काहीच उरले नाही, अशा बोटीत पंजाबची जनता पाय ठेवायचा विचार करणार का – नरेंद्र मोदी
10:36 (IST) 27 Jan 2017
सत्तेत नसल्याने काँग्रेसची अवस्था पाण्याशिवाय तडफडणा-या माशासारखी झाली आहे – नरेंद्र मोदी
10:24 (IST) 27 Jan 2017
काँग्रेस हा शेवटचा घटका मोजणारा पक्ष – मोदी
10:23 (IST) 27 Jan 2017
काँग्रेसचा रंग – रुप काय हेच कळत नाही, त्यांचा मार्ग काय हेदेखील कळत नाही – मोदी
10:22 (IST) 27 Jan 2017
ज्या लोकांनी पंजाबची प्रतिमा मलिन केली त्यांना अशी शिक्षा द्या की ते परत पंजाबवर बोट ठेवू शकणार नाही – मोदी
10:21 (IST) 27 Jan 2017
पंजाबमधील तरुणांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – मोदी

Web Title: Punjab election 2017 pm narendra modi jalandhar rally live updates starts bjp campaign for election

ताज्या बातम्या