• महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलिस महासंचालक एस.एस. विर्क यांचा अंदाज

अकाली दल व काँग्रेसपेक्षा वेगळ्या वाटणारया केजरीवालांची काहींना भुरळ पडलीय. पण इथे काँग्रेसची ताकत चांगली आहे. विशेषत: माझ्झा व दोअबा प्रांतात काँग्रेस चांगल्या जागा मिळवू शकतो. माळवा प्रांतात एकतर्फी काबीज करण्याची भाषा आपकरत असला तरी तिथे काँग्रेसकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एकंदरीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता वाटत नाही. आप आणि काँग्रेस दोघेही (११७पैकी) ४० ते ५०दरम्यान अडकतील, असा माझा अंदाज आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल पंजाबात काही प्रमाणात आकर्षण असले तरीसुद्धा त्रिशंकू विधानसभेची शक्यता वाटत असल्याचा अंदाज पंजाबातील दहशतवाद उपटून काढण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे  एस.एस. विर्क यांना वर्तविला. सध्या चंडीगढमध्ये निवृत्तीचे जीवन व्यतित करणारया विर्क यांच्या नावावर महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांचे पोलिस महासंचालकपद भूषविण्याचा दुर्मिळ बहुमान जमा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची खडानखडा माहिती ठेवणारया विर्क यांना पंजाबच्या राजकारणाची अक्षरश: नस ना नस माहिती आहे. एकेकाळी त्यांनी काँग्रेसमार्फत राजकारण प्रवेशाची चाचपणीही केली होती.

पंजाबच्या गावागावांमध्ये अकाली दलाविरोधात नाराजीची भावना प्रकर्षांने दिसतेय. काय कारणे असावीत?

मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबांची एकाधिकारशाही. मुलगा सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री, सून केंद्रीय मंत्री, सुनेचा भाऊ राज्याचा शक्तिशाली मंत्री.. राजकारणाबरोबर अर्थकारणावरही त्यांचीच पकड. सरकारी बस महामंडळ तोटय़ात आहे, पण बादलांची खासगी वाहतूक कंपनी नफ्यात आहे. वाहतूक, बांधकाम, पर्यटन-हॉटेल, आरोग्य, दारू गुत्ते यासारखी अनेक क्षेत्रे बादलांच्या खिशात आहेत. हे कमी पडले म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांंची गुंडागर्दी. जनता कंटाळलीय त्यांना.

पंजाबमधील व्यसनाधीनता व अंमली पदार्थांनी केलेल्या बरबादीची खूप चर्चा आहे. पण बादल आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हा पंजाबच्या बदनामीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. खरोखरच नेमकी स्थिती आहे?

पंतप्रधानांचे वक्तव्य निराशाजनक आहे. त्यांनी असे प्रमाणपत्र द्ययला नको होते. अंमली पदार्थांचा विळखा नक्की आहे. पंजाबच्या पिढय़ा नासायला लागल्या आहेत. राजकीय स्वार्थासाठी वस्तुस्थितीपासून पळण्यात काही हशील नाही. उलट ती खुल्या दिल्याने स्वीकारली पाहिजे. त्यातच शहाणपण आहे.

एकीकडे अकाल्यांबद्दल नाराजी दिसताना दुसरीकडे केजरीवालांबद्दल उत्सुकतेची भावना जाणवतेय. दिल्लीतील आलेल्या या बिगरशीख नेत्याला पंजाबी जनतेतून प्रतिसाद कशामुळे मिळतोय?

याचे उत्तर दोनच शब्दांत देता येईल. असंतोष आणि पोकळी! सामान्यांच्या मनात धगधगणारी नाराजी आणि त्याचवेळी आपल्याला कुणी वाली नसल्याच्या नैराश्येतून आलेली नेतृत्वाची पोकळी. जनतेतील याच भावनेने केजरीवाल पंजाब राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत. पण त्याचबरोबर त्यांच्या वैशिष्टयपूर्ण प्रचार मोहिमेलाही श्रेय द्यवे लागेल. काँग्रेसमधील अंतर्गंत खेचाखेचीदेखील त्यास कारणीभूत आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ऐनवेळी घोषित करण्यात आले. ते अगोदरच करता आले असते.

पण ही उत्सुकता केजरीवालांना सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचू शके?

मला नाही तसे वाटत. दहा वर्षांंच्या राजवटीमुळे अकाली दल-भाजपबद्दल नाराजीची लाट आहे. पण अकाली आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक नसल्याचे मान्य करावे लागेल. ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फार तर नव्या बाटलीत जुनी दारू म्हणता येईल.

मग.. त्रिशंकुचा तिढा सोडविण्याचा मार्ग कसा असेल?

माझा अंदाज बरोबर ठरलाच तर मग विलक्षण गुंतागुंतीची स्थिती उद्भभवेल. आप आणि काँग्रेस आघाडी होऊ शकत नाही, अकाल्यांचा पाठिंबा घेणे ‘आप’ किंवा काँग्रेसलाही परवडणारे नाही. कॅप्टनसाहेबांनी (अमरिंदर) तसे स्वच्छपणे सांगितले आहे. देव जाणो पुढे काय होईल ते..