मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झालं आहे. कारण ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना बहुमताची संख्या गाठता आलेली नाही. यानंतर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजेच मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. आता मराठी माणसांना वाचवण्यासाठीची आपली लढाई सुरु झाली आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे. जी चर्चेत आली आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई, मराठी माणसाची, भाषेची..

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !

आपला नम्र

राज ठाकरे

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी युती केली होती. या दोघांनी प्रचारही एकत्र केला. पण उद्धव ठाकरेंना जसं यश मिळालं तसं यश राज ठाकरेंना मिळालेलं नाही. आपली लढाई मराठी माणसांसाठी सुरु राहिल असं आता राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. तसंच पराभवामुळे खचून जाणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.