Premium

पाच राज्यांत नरेंद्र मोदी भाजपाचे स्टार प्रचारक; काँग्रेसकडून स्थानिक नेत्यांना महत्त्व; काय होती दोन्ही पक्षांची प्रचारनीती?

काँग्रेसकडून प्रियांका गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांसारखे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

ASSEMBLY ELECTIN RESULT
नरेंद्र मोदी, (संग्रहित फोटो)

अवघ्या काही तासांत तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होईल. या निवडणुकांत विजयी कामगिरी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी जीवाचे रान केले. मात्र, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत प्रचारासाठी वेगवेगळी रणनीती आखली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाकडून दिल्लीतील नेते प्रचाराच्या मैदानात

राजस्थान, छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा; तर तेलंगणा राज्यात बीआरएस पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने; तर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी भाजपाचे नेते या चारही राज्यांत प्रचार करताना दिसले. या नेत्यांनी वेगवेगळ्या सभांना संबोधित करीत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसकडून प्रियांका गांधी-वड्रा, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांसारखे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

नरेंद्र मोदी स्टार प्रचारक

काही वर्षांपासून नरेंद्र मोदी हे भाजपाच्या सर्वोच्च नेतेपदी आहेत. या पक्षाने बहुतांश निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवलेल्या आहेत. मिझोरम आणि उर्वरित चार राज्यांच्या निवडणुकांतही मोदी हेच केंद्रस्थानी होते. विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे भाजपा त्या-त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना पुढे करून, या निवडणुका लढवेल, असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र मोदी हेच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. केंद्रात आणि राज्यांत एकाच पक्षाचे सरकार असेल, तर राज्याचा विकास अधिक वेगाने होतो, असे भाजपाकडून सांगितले जात होते.

काँग्रेसकडून स्थानिक मुद्द्यांना महत्त्व

काँग्रेस पक्षाने मात्र प्रचारादरम्यान स्थानिक मुद्द्यांना स्थान दिले. आम्ही सत्तेत आल्यास जातीआधारित जनगणना करू, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, गॅस सिलिंडरची किंमत कमी करू अशी काही आकर्षक आश्वासने दिली होती. तसेच या निवडणुकांत काँग्रेसने स्थानिक नेत्यांना अधिक महत्त्व दिले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत काँग्रेसने प्रचाराची धुरा स्थानिक नेतृत्वाकडेच सोपवली होती. दुसरीकडे भाजपाकडे मात्र नरेंद्र मोदी हेच स्टार प्रचारक होते.

भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स

विधानसभा निवडणूक असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न मतदारांना पडतो. भाजपाने मात्र मिझोरमसह इतर चारही राज्यांत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आल्यास वसुंधरा राजे या मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते. मात्र, काही दिवसांपासून त्यांना पद्धतशीरपणे दूर केले जात आहे. तसेच राजस्थानचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या भागातील साधू बाबा बालकनाथ, जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी आदी नेत्यांचीही नावे संभाव्य मुख्यमंत्री पुढे येत आहेत. भाजपा ऐन वेळी नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रिपद देऊ शकते, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा निश्चित आणि स्पष्ट असा कोणताही चेहरा नाही.

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही हीच स्थिती

मध्य प्रदेशमध्येही अशीच स्थिती आहे. सध्या या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून कुठेही उल्लेख केलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ओबीसी समाजातून येणारे प्रल्हाद सिंह पटेल, तसेच आदिवासी समाजातून येणारे फग्गन कुलस्ते या नावांचीही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून चर्चा केली जाते. म्हणजेच भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, असा संदेश दिलेला आहे. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमणसिंह हे सर्वोच्च नेते मानले जातात; मात्र तेदेखील या निवडणुकीत फक्त एक उमेदवार होते.

काँग्रेसमध्ये मात्र वेगळी स्थिती

काँग्रेसच्या बाबातीत मात्र चित्र वेगळे होते. या निवडणुकीत या चारही राज्यांसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण असतील? हे जवळजवळ स्पष्ट होते. अशोक गहलोत हे राजस्थान, भूपेश बघेल हे छत्तीसगड, तर कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. राजस्थानमध्ये काहीशी संभ्रमाची स्थिती असली तरी या राज्यात प्रचारादरम्यान गहलोत यांनाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते.

लोकसभेची निवडणूक समोर ठेवून प्रचार

दरम्यान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रंगीत तालीम मानली जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल; तर या निवडणुका जिंकल्यास लोकसभा निवडणुकीचा विजय भाजपासाठी सोपा असेल. याच कारणामुळे भाजपाने लोकसभा निवडणूक लक्षात ठेवूनच प्रचार केला आहे. त्यासाठी मोदी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले; तर काँग्रेसने स्थानिक नेत्यांना, स्थानिक प्रश्नांना महत्त्व देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan chhattisgarh madhya pradesh telangana assembly election result know campaign strategy of bjp and congress prd

First published on: 03-12-2023 at 12:41 IST
Next Story
Telangana : अभाविप, टीडीपी ते काँग्रेस; कधी काळी तुरुंगात गेलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?