मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुका मागच्याच आठवड्यात पार पडल्या आहेत. दरम्यान ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३० मधून सहार शेख ही एमआयएमची तरुण नगरसेविका विजयी झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देऊन जिंकणारी ही नगरसेविका सध्या चर्चेत आहे. ‘कैसा हराया…’ असा प्रश्न विचारत तिने भाषण केलं आहे. जे व्हायरल झालं आहे. आपण जाणून घेऊ कोण आहे सहर शेख?

सोशल मीडियावर सहर शेखची चर्चा

विजयानंतरच्या सभेत सहार शेख यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आलं. त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचत, “आपण ताकदवान लोकांना झुंज दिली आणि त्यांना वाटत होतं की आपण निवडून येणार नाही. पण तुमच्या मदतीने या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असा जोरदार हल्ला चढवला. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असं वक्तव्य केलं. तसेच नोटाला मिळालेल्या मतांचाही उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

मुंब्रा हिरवा करणार म्हणजे काय? याचा अर्थही उलगडला

संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू याचा अर्थ काय हे विचारलं असता सहार शेख म्हणाल्या, “माझ्या पक्षाचा पक्षाचा म्हणजेच एमआयएमचा झेंडा हिरवा आहे. त्यामुळे मुंब्रा हिरवा करायचा आहे असं वक्तव्य केलं. माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मुंब्रा भगवा करु असं मी म्हटलं असतं. इतकाच त्या विधानाचा अर्थ आहे.” सहार शेखने म्हटलं आहे कैसा हराया… असं म्हणत तिने जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. जे लोक समजत होते की आपण हरु, पण आम्हाला अल्लाहने आशीर्वाद दिला असंही सहार शेखने म्हटलं आहे. अहंकारी लोकांचा अहंकार तुम्ही ठेचून काढलात, त्याची लक्तरं केलीत असंही तिने म्हटलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे.

कोण आहे सहर शेख?

१) सहर शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत.

२) सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते.

३) सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे लेकीसाठी तिकिट मागितले होते.

४) तिकिट नाकारल्यानंतर सहर यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली.
सहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

५) सहर शेख यांचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सहारच्या विजयानंतर तिचे वडील युनुस शेख काय म्हणाले?

लेकीच्या दणदणीत विजयानंतर सहार शेखचे वडील युनूस शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना इशारा दिला आहे, आत्ताच वॉर्निंग देतोय इथून पुढे कोणाच्याही लेकीच्या भविष्यासोबत खेळू नका… नाही तर आमची जनता एकत्र होऊन कशी विकेट पाडते पाहिलं ना… हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा कोणत्याही धर्मची असो मुलगी ही मुलगी असते.