संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारण्यात आलेली कंपनी ही गुजरात स्थित आहे. हा प्रकार समोर येऊनही देवेंद्र फडणवीसांची बुळचट शिवसेना गप्प का? असा तिखट प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली. त्यावर महाराष्ट्राच सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली. मराठी माणसाचा आवाज राहू नये, याच कारणासाठी मोदी-शाह यांनी ही शिवसेना फोडली असा आरोप संजय राऊत यांनी केला.

फडणवीसांची शिवसेना बुळचट

“शिवसेना शिंदेगट हे स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवततात, खरी शिवसेना म्हणवतात पण ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गां** शिवसेना गप्प आहे. हिंमत असेल आवाज द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. रविवारी बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं, ही फडणवीसांची बुळचट शिवसेना काय करते?” असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

हे पण वाचा- नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत

आपण शेणात तोंड बुडवायचं आणि..

“देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर आरोप करण्याआधी आमचे ४० आमदार का फोडले ते सांगावं. त्यावर काहीही बोलत नाहीत. शरद पवारांचे ४० आमदार का फोडले हे पण सांगावं. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा ही देवेंद्र फडणवीसांची वृत्ती आहे. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा हे फडणवीसांचं धोरण आहे” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हेमंत करकरेंबाबत काय म्हणाले राऊत?

हेमंत करकरे हे आपले पोलीस अधिकारी देशासाठी लढताना शहीद झाले आहेत. कसाब आणि त्याची टोळी जेव्हा मुंबईत घुसली तेव्हा हेमंत करकरे त्यांचा सामना करत होते. त्यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला की आणखी कुठल्या गोळीने झाला हा भाग आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. पण करकरे हे देशासाठी शहीद झाले तेव्हा ते एटीएसचे प्रमुख होते. हेमंत करकरेंच्या मृत्यूबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. पण मला विचाराल तर मला असं वाटत नाही. कारण इतर पोलीस अधिकारीही या हल्ल्यात शहीद झाले. आता करकरेंबाबत विजय वडेट्टीवार यांनी काही पहिल्यांदा वक्तव्य केलेलं नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि करकरेंमध्ये संघर्ष

आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा झाल्या. एटीएसने त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्या केसचा अभ्यास मी केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे असं सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. आरएएस आणि करकरेंचा संघर्ष सुरु होता. दुसरी गोष्ट की विजय वडेट्टीवार यांचं नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारायचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरु होता. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.