लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, केवळ लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार असली वक्तव्ये करत आहेत. त्यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत.

शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही पक्ष विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्यांवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, कोणत्या पक्षांबद्दल नेमकी चर्चा चालू आहे? मी शिवसेनेबाबत बोलू शकतो. शिवसेना ही कधीच विलीन झाली नाही आणि होणार नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने हा पक्ष उभा केला आहे. या पक्षावर अनेकदा दबाव आले. आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतरच्या काळातही हा पक्ष विसर्जित करण्यासाठी, विलीन करण्यासाठी दबाव निर्माण झाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी या दबावाला कधीच जुमानलं नाही.

संजय राऊत म्हणाले, आणीबाणीच्या काळात शिवसेनेवर विलीनीकरणाचा दबाव आला होता. तेव्हा काँग्रेसचे शक्तीमान नेते, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांनी बाळासाहेबांवर शिवसेना विलीन करण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तेव्हा बाळासाहेबांनी रजनी पटेल यांना एक निरोप पाठवला होता. त्या निरोपात त्यांनी म्हटलं होतं, ज्या क्षणी इंदिरा गांधी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही करतील, त्या क्षणी मुंबईत तुझी अंत्ययात्रा निघेल. हे बाळासाहेबांचे त्या वेळचे शब्द आहेत. त्यानंतर इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही. शिवसेनेची ही आक्रमक भूमिका तेव्हापासून अशीच आहे.

हे ही वाचा >> मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या, “तुमचं टायमिंग…”

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, अनेक वादळांमध्ये, अनेक संकटांमध्ये आम्ही हा शिवसेना पक्ष टिकवून ठेवला आणि वाढवला आहे. अनेकदा पडझड झाली, अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून गेले, बाळासाहेबांच्या हयातीत, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतही अनेक नेते शिवसेना सोडून गेले. त्याबदल्यात पक्षात नवे नेते आले, कार्यकर्ते पुढे आले आणि ते निवडूनही आले. आता माझ्या बाजूला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील बसले आहेत. हे देखील नव्यानेच शिवसेनेत आले आहेत. सांगलीत आणि पश्चिम महाराष्ट्रात ते शिवसेनेचं काम करत आहेत. त्यामुळे मी एकच सांगेन जुने लोक जातात, नवे येतात आणि पक्ष वाढवतात. त्यामुळे पक्ष विलीन करण्याची भूमिका शिवसेनेकडे कधी आलीच नाही. कारण आमच्याकडे आत्मविश्वास आहे. आमचा लोकांवर विश्वास आहे. आमचं नेतृत्व सक्षम आहे आणि लोकांचा आमच्या नेतृत्वावर, आमच्या पक्षावर विश्वास आहे. आमचा पक्ष पुढे नेण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.