पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या. पुण्यात जेव्हा त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं. अशात मोदींच्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला आहे. तसंच शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविषयी काय वाटतं तेदेखील स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोग असे निर्णय घेत आहे ज्यामुळे..

निवडणूक आयोग सध्या असे काही निर्णय घेत आहेत ज्यामुळे अडचण होते आहे. आमचा पक्ष काढून घेतला आमचे चिन्ह काढून घेतला आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं. यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः ४८ पैकी १० जागा लढवत आहोत आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना पाहायला मिळतोय, असेही शरद पवार म्हणाले.

भाजपासह जायचं हे आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं म्हणणं होतं

“भाजपासह जायचं हे आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. आपण सत्तेत गेलं पाहिजे ही बाब त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली नव्हती. मी एक दिवस त्यांचा प्रस्ताव काय आहे तो मागून घेतला, तो प्रस्ताव समजून घेताना आमची चर्चा झाली. प्रत्येकाने भूमिका मांडली पण मी भाजपासह जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. मी शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही भाजपासह जाणार असाल तर जा मी येऊ शकत नाही.” असं शरद पवार म्हणाले, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप घाबरले आहेत असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

हे पण वाचा- शरद पवारांचं वक्तव्य, “गरज संपल्यानंतर भाजपाची जी भावना संघाबाबत तशीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”

पंतप्रधान घाबरले आहेत

शरद पवार यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचंड घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सभा घेतल्या. लोकांशी संवाद साधत असताना ते व्यक्तिगत हल्ले करत आहेत. देशासमोरचे प्रश्न बाजूला ठेवून मला भटकती आत्मा म्हणणं आणि राहुल गांधींचा उल्लेख शहजादा असं करणं हे चुकीचं आहे. हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- बीकेसीतील सभेतून शरद पवारांनी दिलं मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले “हा भटकता आत्मा….”

आत्ताचं चित्र वेगळं असेल

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे चार खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार आणि एमआयएमचा एक खासदार होता. यावेळी मात्र चित्र वेगळे असणार आहे. प्रत्येकांना यावर्षी उत्तम जागा मिळतील निवडणुकीदरम्यान लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या त्यावर आम्हाला हे स्पष्ट झाला आहे मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत मुस्लिम संघटन होते. यावर्षी हे मुस्लिम संघटन त्यांच्यासोबत नाही त्यामुळे यावेळी त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यांच्या मतांचा टक्का यंदा कमी झालेला पाहायला मिळेल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.