Sharad Pawar MahaVikas Aghadi CM Face : महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावला आहे. मविआतील तिन्ही पक्ष राज्यभर पक्षांची मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. तिन्ही पक्षातील नेते यासाठी आपली ताकद पणाला लावत आहेत. सध्या तरी मविआत केवळ काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसे प्रयत्न चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर शिवसेनेच्या ठाकरे गटाची मोट बांधत आहेत. दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचे नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे पक्षवाढीसाठी काम करत आहेत. दरम्यान, "आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल", असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही". शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसची भूमिका काय? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, "आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि बहुमत मिळवून सत्तेत येतो, तेव्हा युती किंवा आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार असतात, त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होतो. सरकार व सरकारमधील पक्षांच्या स्थिरतेच्या दृष्टीने ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील. त्या पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील." हे ही वाचा >> Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री व केंद्र सरकारला म्हणाले… शरद पवार नेमकं काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीमधील एक जबाबदार घटक आहेत, ते आमचे सहकारी आहेत. त्यांनी जे मत मांडलं आहे ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही." नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांचे केवळ नऊ खासदार निवडून आले. तर काँग्रसचे १३ उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर रष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार गट) १० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी आठ जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रात मविआने ३० जागा जिंकल्या, तर राज्यात ४५ जागा जिंकण्याचे दावे करणारी महायुती केवळ १७ जागा जिंकू शकली.