उदयनराजे भोसले १८ एप्रिलला सातार लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपाने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी तीन दिवस ताटकळत राहिल्यानंतर त्यांना भेट देण्यात आली होती. त्यालाही बरेच दिवस उलटून गेले तरी त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर केला. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना उदयनराजेंच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता “राजेंवर आम्ही प्रजा काय प्रतिक्रिया देणार?”, असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार पुढे म्हणाले, त्यांची (उदयनराजे) परिस्थिती सध्या काय आहे, हे माध्यमातूनच आम्ही पाहतोय. त्यावर अधिक काय बोलणार? पण लोकांमध्ये गेल्यावर असे दिसते की, आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबाबत त्यांना विश्वास वाटतो.

उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नाही, अशी टीका भाजपाचे आमदार आणि पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “सातारा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. मागच्यावेळी श्रीनिवास पाटील यांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील जनतेने काय निकाल दिला, हे सर्वांनी पाहिलं. यावेळेस आणखी एक गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यावेळी मविआ आघाडी नव्हती. यावेळी तीन पक्षांसह अनेक पक्ष एकत्र आल्यामुळे वेगळा निकाल दिसेल.”

देशात एक एक जागा निवडून आणावी, असे आमच्या आघाडीचे ध्येय आहे. हे करत असताना मोदींची एक एक जागा कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही राष्ट्रीय गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.

सुनेत्रा पवारांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला

सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत, अशा अर्थाचे विधान शरद पवार यांनी मध्यंतरी केले होते. या विधानावरून सर्वपक्षीय महिला नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना याबाबत पुन्हा प्रश्न केला गेला. तुमच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पत्रकारांनी सांगितले. यावर शरद पवार यांनी सारवासारव केली. ते म्हणाले, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी अजित पवारांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत होतो. अजित पवार यांनी बारामतीकरांनी मला, त्यांना (अजित पवार), मुलीला (सुप्रिया सुळे) आणि आता सुनेला निवडून द्या असे सांगितले होते. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती. मात्र माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ निघाला.