शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोवा काँग्रेसला एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून काँग्रेससोबत युती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला मात्र यात शिवसेनेला यश आलं नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता गोव्यातील सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कोणीच सोबत जर आलं नाही तर स्वबळाची देखील तयारी दर्शवली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वरील विधान केलं आहे. शिवाय, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे असा आरोप करत, भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून शिवसेना इथे वाढतच गेली आहे. कधीकाळी भाजपा देखील सुरूवातीला इथे जेव्हा लढला होता, तेव्हा १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हे राजकारणात निवडणुकांमध्ये हे असं सुरूवातीच्या काळात होत असतं. भाजपाचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचं डिपॉझिट गेलं होतं. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य लोकाचे डिपॉझिट गेले आहे, म्हणून लढायचं नाही का? पण आता गोव्यात शिवसेना रूजते आणि रूजली आहे. एकरत महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, शिवसेनेचं काम करत आहेत आमचे लोक आणि भाजपा विषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. इथे जो गोव्यात भाजपा दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचं इथे सरकार आलं नाही. मनोहर पर्रिकर होते तेव्हा देखील. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही.” असं संजय राऊत एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले आहेत.

भाजपाला बहुमत मिळणार नाही, लोक निवडून देणार नाहीत हे लिहून ठेवा –

तसेच, “यावेळी देखील भाजपाला बहुमत मिळणार नाही. लोक निवडून देणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा. शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाहीए, होण्याची शक्यता नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपाने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. त्याच्या विषयी काही निर्णय होत नव्हता, त्यामुळे आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील, मी देखील असेल आणि आम्ही आमच्या जागा जाहीर करू.” अशी माहिती देखील संजय राऊत यांनी यावेळी दिली.

याचबरोबर, “भाजपाचं आव्हान तुम्ही मानत नाही आहात का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे पाहा गोव्यात कोणालाच कोणचं आव्हान नाही. गोव्यात दहा-बारा लोक आहे ते कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात, कधी इकडे तर कधी तिकडे हे जे प्रस्थापित लोक आहेत. तेच गोव्याचं राजकारण करतात. सामान्य माणसाला इथे संधीच नाही. शिवसेना सामान्यातील सामान्य माणसाला उमेदवारी देऊन निवडणुका लढणार.” असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

“…मात्र, काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायच्या असतात”, गोव्यातील परिस्थितीवर संजय राऊत यांचं वक्तव्य

तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकासआघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं. तसेच काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायला लागतात असं सूचक वक्तव्यही केलं होतं. संपर्क करायला उशीर झाला हे काँग्रेस नेते दिगंबर कामत यांचं बरोबर असल्याचं मान्य करत त्यांनी आघाडीत काही गोष्टी अ‍ॅडजस्ट कराव्या लागतात असं म्हटलं होतं. तसेच गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याचंही स्पष्ट करत टीएमसीचेही नेते भेटणार असल्याचंही सांगितलं होतं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ready to fight on its own in goa sanjay raut msr
First published on: 15-01-2022 at 11:47 IST