लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होत आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज इंडिया आघाडी आणि महायुतीच्या जाहीर सभा मुंबईमध्ये होत आहेत. बीकेसीच्या सभेत बोलत असताना शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच मुंबईत गुजराती लोकांकडून मराठी माणसाला जी वागणूक दिली जात आहे, त्याचाही समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. मोदींमुळे दोन-चार गुजराती मस्तवाल झाले आहेत. मराठी माणसाला प्रवेश नाकाराल तर तुम्हाला ‘गेट आऊट’ करू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

चीनच्या आक्रमणाकडे कुणी पाहायला तयार नाही. पण आम्हाला पराभूत करण्यासाठी सगळी फौज इकडे आली आहे. हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण हा मोदी-शाहांचा महाराष्ट्र होणार नाही. भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झाला आहे. आमच्या पक्षातील कचरा भाजपाने गोळा केला आहे. ही पहिली निवडणूक आहे की, मोदींना प्रचाराची दिशाच सापडत नाही. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १६ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांचे रक्तही सुकले नव्हते, तिथे तुम्ही वाजत गाजत रोड शो केलात. इतके कसे निर्दयी झालात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्वात आधी…”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, नाशिकमध्ये भाषण करताना मोदी हिंदू-मुस्लीम करत होते. एक तरूण शेतकरी उठून कांद्यावर बोला, अशी घोषणा देऊ लागला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. एका हुकूमशहाची नजर कशी असते? हे त्यावेळी मोदींच्या डोळ्यात पाहून समजले. मोदीजी तुमची भारतमाता आहे तरी कशी? हा शेतकरीच आमची खरी भारतमाता आहे.

मुस्लीमांना तुम्ही घुसखोर बोलता, त्यांना दहशतवादी बोलता आणि वर म्हणता हिंदू मुस्लीम केले असेल तर मी राजकारणात राहण्यास लायक राहणार नाही. परवा मोदी म्हणाले की, मी लहानपणापासून मुस्लीम कुटुंबियांबरोबर राहत आलो आहे. ईदला आमच्या घरी जेवण बनत नसे. मुस्लीम कुटुंबातून आमच्या घरात जेवण यायचे. मग मोदीजी त्या जेवणाचा मेनू काय असायचा हे पण सांगून टाका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

मोदींमुळे मस्तवाल झालेल्या गुजरात्यांना धडा शिकवू

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबईकर जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्यांना शिवसैनिक मदत करायला धावून जातो. भाजपाचे लोक जात नाहीत. मदत करताना शिवसैनिक कुणाची जात, धर्म, भाषा विचारत नाहीत. मोदीजी तुमचा पक्ष स्वातंत्र्यलढ्यात तर नव्हताच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही नव्हता. मोदींचे पूर्वज मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांवर गोळ्या घातल्या होत्या. रक्त सांडून आम्ही मुंबई मिळवली. देसाई म्हणाले होते की, गोळ्या माणसांना मारण्यासाठी दिल्या आहेत, त्या वाय घालवायच्या नाहीत. एवढी मस्ती आमच्या घरात येऊन दाखवता. कंपन्यामध्ये मराठी माणसांना घेणार नाही, अशी दादागिरी करता काय? गुजरातीही आमचेच आहेत. पण मोदींमुळे जे दोन-पाच मस्तवाल झाले आहेत. त्यांना सांगोत वेळीच सुधरा. मराठी माणसाला जर तुम्ही प्रवेश दिला नाही तर तुमचे दरवाजे बंद करून तुम्हाला गुजरातला पाठविल्याशिवाय राहणार नाही.

मोदींना मी सांगू इच्छितो, मुंबईत आम्ही मराठी, गुजराती, हिंदी, मुस्लीम सर्व गुण्या गोविंदाने राहत आहोत. त्यांच्यामध्ये मीठ टाकण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.