उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. मंगळवारी कामगार कल्याणमंत्री व ओबीसी समाजातील प्रबळ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. मौर्य यांचे समर्थक व भाजपाचे तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती यांच्यासह अन्य दोन आमदारांनीही भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर २४ तासांत भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची संजय राऊत भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांना माध्यमांसोबत संवाद साधला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबाबत राकेश टिकेत यांचा कल समजून घेत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या त्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले.

“काही राजकारण्यांना उत्तर प्रदेशची हवा पटकन कळते आणि त्यानुसार ते पक्ष बदलत असतात. कोणी कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजून देत असले तरी जमिनीवरचे सत्य वेगळे आहे. भाजपाला सहज विजय मिळेल अशी उत्तर प्रदेशात परिस्थिती नाही. सगळे विरोधीपक्ष एकवटले आहेत. त्यांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांना प्रचंड आव्हान उभे केले आहे आणि त्यातून पळापळ सुरु झाली आहे,“ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“आम्ही उत्तर प्रदेशमध्ये ५० ते १०० उमेदवार निवडणुकीसाठी उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आम्हाल येऊन भेटत आहेत. शिवसेनेचे अस्तित्व उत्तर प्रदेशमध्ये असणे ही काळाची गरज आहे. यावेळी विधानसभेमध्ये आमचे प्रतिनिधी असतील याची आम्हाला खात्री आहे. अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने फार मोठा संघर्ष केला आहे. अयोध्येचे आंदोलन थंड पडलेले असताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे जाऊन त्या विषयाला चालना दिली आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर मंदिर उभे राहत आहे. शिवसेनेचे अयोध्येत आणि मथुरेत उमेदवार असणार आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर भाजपा सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. चौहान हेसुद्धा स्वामींप्रमाणेच ओबीसी समाजातील होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut reaction after the resignation of the minister in uttar pradesh abn
First published on: 13-01-2022 at 09:49 IST