Sillod Assembly Constituency Shivsena Stronghold : जालना लोकसभा मतदासंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. कारण या मतदारंसघाचे आमदार अब्दुल सत्तार हे राज्याचे विद्यमान मंत्री आहेत. या मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. पण मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणं बघता त्यांच्यापुढे बरीच आव्हानंदेखील आहेत. या आव्हानांचा सामना करत अब्दुल सत्तार विजयाचा चौकार लगावतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ औरंगाबादमध्ये येत असला तरी जालना लोकसभा मतदासंघाचा भाग आहे. कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, आता या मतदासंघावर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनीही वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यांनी सलग तीन वेळा या मतदासंघात विजय मिळवला आहे. मुळात या मतदासंघाची निर्मिती १९६२ मध्ये करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबूराव जंगलू यांनी विजय मिळवला. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवराम मानकर यांनी विजय मिळाला.

हेही वाचा – शिटी साठी बविआ ची उच्च न्यायालयात धाव

१९७८ च्या निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघात पहिला विजय नोंदवला. पण पुढे १९९० च्या दशकात हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. १९९५ ते २००४ पर्यंत पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या किसनराव काळे आणि संधू लोखंडे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं. २००९ च्या विधासभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढवली तसेच या निवडणुकीत विजय मिळवला.

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाजपाने सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली. मात्र, केवळ १३ हजार ९२१ मतांनी सुरेश बनकर यांचा पराभव झाला. त्यांना एकूण ८२ हजार ११७ मते मिळाली, तर अब्दुल सत्तार यांना एकूण ९६ हजार ३८ मते मिळाली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी शिवसनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने माणिकराव पलोडकर यांना उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीतही अब्दुल सत्तार यांचा विजय झाला, त्यांना एकूण १ लाख २२ हजार ६२७ मते मिळाली. तर पलोडकर यांना एकूण ९८ हजार १६२ मते मिळाली. या निडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे किसनराव वानखडे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना एकूण ७ हजार ७७८ मते मिळाली होती.

हेही वाचा – अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये

अब्दुल सत्तारांपुढील आव्हानं काय?

महायुतीच्या जागावाटपानुसार हा मतदासंघ पुन्हा शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे ) वाट्याला आला आहे. त्यांनी अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र तरीही यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी म्हणावी इतकी सोपी नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर येथील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्याचा डाग सत्तार यांच्यावर आहे. याशिवाय वादग्रस्त विधानं आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे) वाट्याला गेला आहे. त्यांनी सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. खरं तर २०१४ आणि २०१९ मध्ये अब्दुल सत्तार यांना मिळालेली मतं ही अविभाजीत शिवसेनेची होती. पण आता शिवसेनेतील फुटीमुळेही मतही विभागली जाण्याची शक्यता आहे. यापैकी जास्तीत जास्त मते आपल्याकडे खेचण्याचं मोठं आव्हान अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sillod assembly constituency political history abdul sattar challenges spb