लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रीय पातळीवर एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र, त्याचवेळी एनडीएला मिळालेल्या जागा कमी झाल्या असून भाजपाच्या जागा तब्बल ६३ ने कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातही याच प्रकारचं चित्र असून महायुतीच्या जागा थेट १७ पर्यंत खाली आल्या आहेत. महाविकास आघाडीला तब्बल ३० जागांवर विजय मिळाला आहे. महाराष्ट्रातील मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय झाला असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं आहे!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार ४० आमदार व अनेक कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसह बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पक्ष व पक्षनावावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगानेही अजित पवारांच्या बाजूनेच निकाल दिला. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हा सामना चांगलाच रंगला होता. त्यात बारामती म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तिथेच शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना असल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान

अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतदान झालं आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल ४८ हजाराहून अधिक मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील हे कल पाहाता आगामी विधानसभेत नेमकं काय चित्र असेल? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भात आज सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळेंचं पुण्यात जोरदार स्वागत

सुप्रिया सुळेंचं निवडणूक निकालांनंतर पुण्यात जोरदार स्वागत झालं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बारामतीमधून मिळालेलं सर्वाधिक मतदान आणि अजित पवार यांच्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी त्यावर भाष्य केलं.

सुप्रिया सुळेंना एकूण ७ लाख ३१ हजार ४०० मतं मिळाली असून सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ मतं मिळाली आहेत. एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक म्हणजेच १ लाख ४३ हजार ९४१ मतं मिळाली. त्याउलट सुनेत्रा पवारांना बारामतीमधून ९६ हजार ५६० मतं मिळाली. त्यामुळे अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना इतर पाच विधानसभा मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. खडकवासला या एकमेव मतदारसंघात सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांपेक्षा कमी मतदान झालं आहे. सुप्रिया सुळेंना तिथे १ लाख २१ हजार १८२ मतदान झालं असून सुनेत्रा पवारांना १ लाख ४१ हजार ९२८ इतकं मतदान झालं आहे.

Video: आता अजित पवारांना काय सल्ला द्याल? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताच म्हणाल्या,…

“बारामती विधानसभा मतदारसंघातून ४८ हजारांचं मताधिक्य मिळालं. आपण एखादी निवडणूक लढतो, तेव्हा ती कोणत्या व्यक्तीविरोधी नसते. माझी लढाई वैचारिक आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईच्या विरोधात आहे. या सरकारने ज्याप्रकारे शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचं पाप केलंय, त्याविरोधात माझी लढाई आहे”, असं त्या म्हणाल्या. “खडकवासल्यात ६५ हजारांनी मागे होतो. यावेळी पक्षात हे सगळं घडत असताना १९ वर आलो. म्हणजे आम्ही ४० हजार कव्हर केले. आमचे तिथे ५-७ नगरसेवकच राहिले होते. बाकी सगळे अजित पवार गटात गेले होते. तरी आम्ही ४० हजार मतं कव्हर केली”, असंही सुप्रिया सुळेंनी यावेळी नमूद केलं.

अजित पवारांना सल्ला देणार का?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत लढवलेल्या चार जागांपैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे आता अजित पवारांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं. “मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो”, असं त्या म्हणाल्या.

Live Updates