लोकसभेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. यानंतर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांच्याबरोबर एनडीएमधील पक्षाच्या जवळपास ७० खासदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. तर या निवडणुकीमध्ये १२१ अशिक्षित उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. मात्र, यापैकी एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. या निवडणुकीत एकही खासदार हा निरक्षर नसून यातील ८० टक्के खासदार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात समोर आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतः ला निरक्षर घोषित करणारे १२१ उमेदवार पराभूत झाले असल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एनडी टीव्हीने दिलं आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लीम चेहरा नाही, कॅबिनेटमध्ये केवळ ‘इतके’ अल्पसंख्यांक

दरम्यान, संसदेत निवडून गेलेल्या नवनिर्वाचित खासदारांपैकी बहुसंख्य खासदार उच्चशिक्षित आहेत. तसेच एडीआरच्या अहवालानुसार, या निवडणुकीतील १९ टक्के विजेत्या उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता ५ वी पास आणि इयत्ता १२ वी दरम्यान शिक्षण असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, एडीआरने असंही स्पष्ट केलं की, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतःला निरक्षर घोषित करणाऱ्या १२१ उमेदवारांपैकी १२१ उमेदवार म्हणजे सर्वच्या सर्व उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

अहवालानुसार, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांपैकी १९ टक्के उमेदवार हे ५ वी पास आणि इयत्ता १२ वी दरम्यानचे शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर नवीन खासदारांमध्ये ७७ टक्के उमेदवारांनी पदवीचं शिक्षण घेतलं असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच १७ खासदार हे डिप्लोमा धारक आहेत. तसेच ५ टक्के खासदारांकडे डॉक्टरेट पदवी असलेलं शिक्षण असून त्यापैकी काही महिलाही आहेत.