Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात सर्वात आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोदी हे देभभर भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान ते काँग्रेस, आम आदमी पार्टीसह वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांवर, इंडिया आघाडीतल्या सदस्य पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आहेत. रविवारी (२१ एप्रिल) मोदी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले, “जे राजस्थानमधून पळून गेले होते तेच आता राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत.” मोदी यांनी यावेळी काँग्रेस पक्ष सांभाळणाऱ्या गांधी कुटुंबावर आणि त्यांच्या कथित घराणेशाहीवरही हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी रविवारी राजस्थानच्या जलोर येथील प्रचारसभेत बोलत होते.

जलोरच्या सभेत मोदी म्हणाले, देश आता काँग्रेस पक्षाला त्यांच्या पापांची शिक्षा देत आहे. जो पक्ष पूर्वी ४०० जागा जिंकायचा तोच पक्ष आता ३०० जागा लढण्यासही असमर्थ ठरतोय. आपला देश आता खूप विचार करून मतदान करतोय. कारण त्यांना आता २०१४ च्या आधी देशात जशी परिस्थिती होती ती नको आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सोनिया गांधींवरही टीका केली. ते म्हणाले, जे लोक निवडणूक लढू शकत नाहीत, ते मैदान सोडून पळून जातायत. यावेळी ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत.

इंडिया आघाडीवर टीका

काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले, त्यांची परिस्थिती आता खूपच नाजूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता एक संधीसाधू आघाडी केली आहे. ती आघाडी म्हणजे पतंग आहे. तो पतंग उडण्याआधीच त्याचा मांजा कापला गेला आहे. आता ती केवळ नावाचीच आघाडी राहिली आहे. कारण या आघाडीतले घटकपक्ष अनेक राज्यांमध्ये एकमेकांविरोधात लढत आहेत.

हे ही वाचा >> अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार

नरेंद्र मोदी म्हणाले, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात निम्म्या राजस्थानने काँग्रेसला दंड केला आहे. काँग्रेस कधीही देशाला मजबूत बनवू शकत नाही हे देशभक्तीने युक्त असलेल्या राजस्थानला ठाऊक आहे’, असे मोदी म्हणाले. २०१४ पूर्वी अस्तित्वात असलेली परिस्थिती परत यावी असे देशाला वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने भाईभतिजावाद आणि भ्रष्टाचार यांची वाळवी पसरवून देशाला पोकळ करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.