मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला ६ जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा महापौर बसणार नाही. कारण मॅजिक फिगर त्यांना गाठता आलेली नाही. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. आमचा परायजयाला तेज आहे, भाजपाचा विजय डागाळला आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंं आहे.
मी सगळ्या ठिकाणी प्रचाराला जाऊ शकलो नाही-उद्धव ठाकरे
सगळ्या महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. मुंबई, ठाणे, आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी गेलो. आपल्या माध्यमातून मी जिथे जाऊ शकलो नाही त्या सगळ्या शिवसैनिक आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. चांदा ते बांदा ज्या मतदारांनी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या शिवशक्तीला मतदान केलं आहे त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांनी लढवल्या. प्रत्येक निवडणूक ही जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने त्यांनी साम-दाम-दंड-भेद या पलिकडे जाऊन निवडणुका लढवल्या. पैशांची आमिषं दाखवली, धाक दाखवला. सगळ्या गुंडगिरीला न घाबरता ज्यांनी लढत दिली आणि ज्यांनी मतदान केलं ते लोकशाहीचे रक्षक आहे. मुंबईत आमचा महापौर व्हावा अशी इच्छा होती, आजही आहे. पण ती संख्या आम्ही गाठू शकलो नाही. पण या सगळ्या खेळाला उत्तर देऊन जे यश मिळालंय त्यामुळे त्यांना घाम फोडलाय हे नक्की असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एका गणिताचं उत्तर मला मिळालं नाही-उद्धव ठाकरे
एका गणिताचं उत्तर मला मिळालं नाही. विधानसभेच्या वेळी मोदींची सभा झाली, यावेळी फडणवीसांची सभा झाली पण खुर्च्या रिकाम्या होत्या. मी आणि राजने सभा घेतली त्याला प्रचंड प्रतिसाद होता. त्यांच्याकडे रिकाम्या खुर्च्यांनी कसं काय मतदान केलं हे कोडं आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी जे काही पैशांचं वाटप केलं त्यामागे पैशांचं वाटप आहे. आमचे निवडून आलेले नगरसेवक गळाला लावले होते, ते आता गाळात गेले. विकास निधीच्या नावाखाली पैसे वाटले. प्रेशर कूकर, साड्या, इतर गोष्टी वाचल्या. हा पैसा येतो कुठून? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
भाजपाने कागदावरची शिवसेना संपवली असेल पण..
भाजपाने कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे मतदारांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलंय. तसंच भाजपा हा पक्ष कागदावर आहे पण जमिनीवर नाही. कारण तो असता तर त्यांना यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नेते फोडावे लागले नसते. जे निवडून आले आहेत ते साधे आहेत. ज्यांनी यांच्यासमोर लढा दिला. मला मुंबईकरांकडून अजून अपेक्षा होती. कोविड काळातही चांगलं काम केलं होतं. मुंबईकर भरघोस आशीर्वाद देतील असं वाटलं होतं. तरीही जे दिलंय ते भरपूर दिले आहेत.
आमच्या पराजयाला तेज आहे आणि त्यांचा विजय डागाळलेला आहे- उद्धव ठाकरे
आमचा पराभव झाला आहे असं मला वाटतच नाही. शिवाय आमचा पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय डागाळलेला आहे. मी जे अॅनाकोंडा म्हणतो आहे त्याचं कारण हेच आहे की भाजपाची मानसिकताच वापरा आणि फेकून द्या अशी आहे. ज्यांना बरोबर घेतलं आहे त्यांनाही संपवणार आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
