मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला ६ जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा महापौर बसणार नाही. कारण मॅजिक फिगर त्यांना गाठता आलेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंनी या सगळ्या निकालांबाबत पत्रकार परिषद घेतली आणि भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंनी मतदार आणि उमेदवारांची का मागितली माफी?

सगळ्या महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. मुंबई, ठाणे, आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी गेलो. आपल्या माध्यमातून मी जिथे जाऊ शकलो नाही त्या सगळ्या शिवसैनिक आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. चांदा ते बांदा ज्या मतदारांनी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या शिवशक्तीला मतदान केलं आहे त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांनी लढवल्या. प्रत्येक निवडणूक ही जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने त्यांनी साम-दाम-दंड-भेद या पलिकडे जाऊन निवडणुका लढवल्या. पैशांची आमिषं दाखवली, धाक दाखवला. सगळ्या गुंडगिरीला न घाबरता ज्यांनी लढत दिली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र आलात पण त्याचा फायदा तुम्हाला जास्त झाला राज ठाकरेंना नाही असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले, “असं काही म्हणता येणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना मदत केली आहे. मी आधीच म्हटलं होतं, एकत्र आलो आहोत ते एकत्र येण्यासाठी. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते सोडून द्या. ते उगाच वाद निर्माण करण्याचं काम करत आहेत.” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.

भाजपाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपा मुंबईत वाढली कशी? एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीशिवाय काँग्रेसचे खासदार निवडून येत नव्हते. कुठेतरी आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत का? भाजपा इतकी मोठी कशी झाली? असा प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, “मी विचित्र काही बोलत नाही. पण बाळासाहेबांनी जर त्यांना (भाजपा) दोन घास भरवले नसते तर भाजपाचा राजकारणात कुपोषणाने तेव्हाच बळी गेला असता.” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

आमच्या पराजयाला तेज आहे आणि त्यांचा विजय डागाळलेला आहे- उद्धव ठाकरे

आमचा पराभव झाला आहे असं मला वाटतच नाही. शिवाय आमचा पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय डागाळलेला आहे. मी जे अॅनाकोंडा म्हणतो आहे त्याचं कारण हेच आहे की भाजपाची मानसिकताच वापरा आणि फेकून द्या अशी आहे. ज्यांना बरोबर घेतलं आहे त्यांनाही संपवणार आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.