नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय फोडाफोडीला वेग आला आह़े  स्वामी प्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ बुधवारी राज्याचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान या दुसऱ्या प्रबळ ओबीसी नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनेही वेगाने हालचाली करत बुधवारी समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या एका आमदाराला प्रवेश दिला़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ओबीसीतील कुशवाहा समाजाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार रोशनलाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती आणि भगवती सागर आणि विनय शाक्य हे समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करतील. दारासिंह चौहान यांनीही ‘सप’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चौहान तसेच पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या अन्य आमदारांशी भाजपच्या वतीने संपर्क साधण्यात आला होता. मात्र, चौहान यांनी भाजप नेतृत्वाची विनंती अव्हेरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी भाजपचा राजीनामा दिला आह़े  दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे हरिओम यादव तसेच काँग्रेसचे नरेश सैनी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. याखेरीज समाजवादी पक्षाच्या दोन माजी आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला़

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे चौहानही बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये आले होते व त्यांच्याकडे भाजपच्या ओबीसी मोर्चाची जबाबदारी देण्यात आली होती़  २०१७ मध्ये चौहान यांना मंत्रिपद देण्यात आले. २००९मध्ये ते बसपचे लोकसभेतील खासदार होते. ‘‘माझे म्हणणे कोणाला ऐकायची इच्छा नसेल तर काय करणार? राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही’’, असे चौहान यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी चौहान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़  चौहान हे मोठय़ा भावासारखे असून त्यांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहनही केशव मौर्य यांनी केले होत़े

विद्यमान आमदारांना पुन्हा संधी?

दिल्लीत बुधवारीही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवर भाजपनेत्यांची चर्चा सुरू होती. पहिल्या तीन टप्प्यांतील १८५ जागांसाठी उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जात आहे. मंगळवारी १० तास झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यांतील उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. गुरुवारीही बैठक होणार असून तिसऱ्या टप्प्यांतील उमेदवार निश्चित केले जातील. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आदी उत्तर प्रदेशातील भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्लीतच आहेत. स्वामी प्रसाद मौर्य व दारासिंह चौहान यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर उमटले आहेत. पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याने आमदार भाजप सोडून ‘’सप’’मध्ये जात असल्याचे भाजपकडून बुधवारी सांगितले जात होते. पण, विद्यमान आमदारांना सलग दुसऱ्यांदा तिकीट न देता काही मतदारसंघांमध्ये नवा उमेदवार देण्याच्या भाजपच्या धोरणातही बदल केला जाणार असल्याचे मानले जात आहे.

पडझड थांबविण्याची भाजपची धडपड

भाजपमधील पडझड थांबवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली असून, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना नाराज भाजप मंत्री-आमदार व नेत्यांशी संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे. संघटन महासचिव सुनील बन्सल व प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांच्यावर पक्षातील असंतुष्टांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते. मौर्य व चौहान यांनी दलित व ओबीसींवर अन्याय होत असल्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नेत्यांशी संपर्क साधला जाणार आहे.

मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट

ंमंत्रिपदासह भाजपचा राजीनामा दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात आठ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात सुलतानपूर न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आह़े २०१४ मधील द्वेषमूलक वक्तव्यप्रकरणी मौर्य यांच्या अटक वॉरंटला २०१६ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती़  सुलतानपूर न्यायालयाने ६ जानेवारीला त्यांच्याविरोधात वॉरंट बजावून १२ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होत़े  मात्र, न्यायालयात गैरहजर राहिल्याने मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगण्यात आल़े

आदित्यनाथ अयोध्येतून?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आह़े  भाजपच्या राज्य निवडणूक समितीच्या दिल्लीतील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजत़े  मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही़  मुख्यमंत्री बनण्याआधी योगी आदित्यनाथ गोरखपूरचे खासदार होत़े

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up assembly election 2022 another up minister quit party zws
First published on: 13-01-2022 at 04:02 IST