scorecardresearch

Premium

UP Assembly Election Results 2022 : “हा उत्सव लोकशाहीसाठी, आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळाला”; भाजपाच्या विजयावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

UP Assembly Election 2022 Results News Updates: उत्तर प्रदेशात भाजपा सत्ता कायम राखणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे

योगी आदित्यनाथ इतिहास रचण्याच्या तयारीत
योगी आदित्यनाथ इतिहास रचण्याच्या तयारीत

Uttar-Pradesh Assembly Election Live Updates: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही राज्यांमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

supreme court
राजस्थान, मध्य प्रदेश सरकारला मोफत लाभप्रकरणी नोटीस
Madhya Pradesh Elections 2023 bjp vs congress
“माझ्या बहिणींनो तुम्हाला…”, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची महिला मतदारांना भावनिक साद
shivraj singh chauhan narendra modi
मध्य प्रदेशात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना उतरवलं मैदानात
amir khan
हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्तांना आमिर खानचा मदतीचा हात; २५ लाख रुपये केले दान
Live Updates

UP Assembly Election Result 2022 Live News : उत्तर प्रदेशात योगी इतिहास रचण्याच्या तयारीत; सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणार

19:00 (IST) 10 Mar 2022
हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याणावरील अढळ विश्वासाचा विजय – अमित शाह

उत्तर प्रदेशातील खेडोपाडी, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोठा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याणावरील अढळ विश्वासाचा विजय आहे. जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भीती आणि भ्रष्टाचारमुक्त सुशासनावर शिक्कामोर्तब केले आहे. या प्रचंड विजयाबद्दल मी उत्तर प्रदेशच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

18:28 (IST) 10 Mar 2022
पुन्हा एकदा भाजपाने या सर्वांना धडा शिकवला – योगी आदित्यनाथ

जेव्हा आपण राज्यात करोनाशी लढत होतो, तेव्हा हे लोक भाजपा आणि सरकारविरोधात कट रचण्याचे काम करत होते. आज पुन्हा एकदा भाजपाने या सर्वांना धडा शिकवला असून त्यांची बोलती बंद करण्याचे काम केले आहे. राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन या मुद्द्यावर आपण जे मतदान केले आहे, ते आपण सर्वांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले पाहिजे. राज्यातील निम्म्या लोकसंख्येला माता, बहिणी आणि मुलींनी ज्या प्रकारे पाठिंबा दिला त्यामुळे भाजपा राज्यात इतिहास घडवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या यशस्वी नेत्याच्या नेतृत्वात एवढं प्रचंड बहुमत मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

18:15 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार – योगी आदित्यनाथ

आदरणीय पंतप्रधानांचे आभारी आहोत ज्यांनी उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ दिला. उत्तर प्रदेशच्या विकासासोबतच उत्तर प्रदेशसारख्या राज्यात सुशासन प्रस्थापित करण्याच्या मार्गात आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

18:09 (IST) 10 Mar 2022
आम्हाला बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी – योगी आदित्यनाथ

राज्याची विशालता पाहता सर्वांच्या नजरा यूपीकडे होत्या. आम्हाला बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहोत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

16:51 (IST) 10 Mar 2022
निकालावर गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

पाच राज्यांच्या निकालाचा नेमका अर्थ काय आहे? यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.

16:14 (IST) 10 Mar 2022
राहुल गांधींनी मान्य केला पराभव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून पाच राज्यांमध्ये झालेला पराभव मान्य केला आहे.

15:52 (IST) 10 Mar 2022
आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दलचा ‘तो’ अंधविश्वास ठरवला खोटा

उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दल असणारी ती दंतकथा खोटी ठरवली आहे.

उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्यमंत्री नोएडामधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात गेला तर तो पुन्हा सत्तेत येत नाही अशी गेल्या तीन दशकांपासून दंतकथा आहे. पण योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता मिळवत हे खोटं असल्याचं सिद्ध केलं.

आदित्यनाथ गोरखपूर अर्बन मतदारसंघातूनही विजयी होत आहेत. याशिवाय गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील तिन्ही भाजपा उमेदवारही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

15:45 (IST) 10 Mar 2022
राष्ट्रीय लोक दल आणि सपा युतीचा मेरठमधील ३ जागांवर पराभव

मेरठमधील सर्व तिन्ही जागांवर राष्ट्रीय लोक दल आणि सपा युतीच्या उमेदवारांचा पराभव होत आहे. अखिलेश आणि जयंत यांनी मेरठमधील सभेत सर्वात प्रथम युतीची घोषणा केली होती.

15:25 (IST) 10 Mar 2022
बुल्डोझरसमोर काहीच टिकू शकत नाही – हेमा मालिनी

उत्तर प्रदेशात भाजपा पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे की, “आमचं सरकार हे आम्हाला आधीच माहिती होतं. बुल्डोझरसमोर काहीच टिकू शकत नाही. सायकल असो किंवा अन्य काही एका मिनिटात ते संपवून टाकेल,” असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

15:19 (IST) 10 Mar 2022
कसा आहे भारताचा राजकीय नकाशा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशात सध्या नेमकं चित्र काय आहे जाणून घ्या (सविस्तर बातमीसाठी)

15:14 (IST) 10 Mar 2022
Election Result 2022 : विजयी पक्षांचे शिवसेनेकडून अभिनंदन – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विजय पक्षांचं अभिनंदन केलं आहे. पराभव पचवणं सोप्पं असते, विजय पचवायला शिकायला हवं. सुडाने राजकारण न करता, लोकांच्या हितासाठी काम करा असं यावेळी ते म्हणाले आहेत.

15:00 (IST) 10 Mar 2022
स्वामी प्रसाद मौर्य पराभूत

भाजपातून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगरमधून २१ हजार मतांनी पराभूत झाले आहेत.

14:57 (IST) 10 Mar 2022
निकालांवरुन नारायण राणेंची टीका, म्हणाले “महाराष्ट्रातील मिसळ सत्तारूढ…”

उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला अपयश आल्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत टीका केली असून “महाराष्ट्रातील 'मिसळ' सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत,” असा टोला लगावला आहे.

“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. देशातील काँग्रेस व अन्य पक्षांनी या निवडणुकांच्या निकालातून एक बोध घ्यावा, टीका करून निवडणूक जिंकता येत नाही आणि लोकांचा विश्वासही संपादन करता येत नाही,” असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

14:26 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही – शरद पवार

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही. ते उत्तर प्रदेशात एकटे लढले आहेत. तिथे, जी मत त्यांना पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असं शरद पवार म्हणाले आहेत.

14:25 (IST) 10 Mar 2022
पंजाब निकालावर शरद पवारांचं भाष्य

“पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाब सोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.

“पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. पण तिथे तीन चार महिन्यांमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाचा स्विकार पंजाबच्या जनतेने केला नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता,” असं शरद पवार म्हणाले.

13:45 (IST) 10 Mar 2022
पाच राज्यांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

दिल्लीतल्या कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाल्याचंही शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले आहेत. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

13:37 (IST) 10 Mar 2022
भाजपा कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन

उत्तर प्रदेशात भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन

12:57 (IST) 10 Mar 2022
शिवाजी पार्कमध्ये युवराज हत्तीवरून साखरसुद्धा वाटतील, आशिष शेलारांचा टोला

गोवा आणि युपीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. “अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील… शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

“इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार, उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो, उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा…सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल…हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”, असंही ते म्हणाले आहेत.

12:49 (IST) 10 Mar 2022
भाजपा कार्यकर्त्यांचं होळी खेळत सेलिब्रेशन

उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता येत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमधील कार्यालयाबाहेर होळी खेळत सेलिब्रेशन केलं.

12:26 (IST) 10 Mar 2022
काँग्रेसने शेअर केला राहुल गांधींचा व्हिडीओ

काँग्रेसने राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते घाबरायचं की नाही हा आपला निर्णय असल्याचं सांगत आहे. यावेळी ते आपण घाबरणार नाही असंही सांगताना व्हिडीओत दिसत आहेत.

12:15 (IST) 10 Mar 2022
ही राम राज्याची सुरुवात – रवी किशन

गोरखपूरचे आमदार आणि भाजपा नेते रवी किशन यांनी भाजपाच्या विजयाचं सेलिब्रेशन करत मिठाईचं वाटप केलं. “मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना तळागळापर्यंत जाऊन काम करण्याची शिकवण दिली असून त्यामुळेच हा विजय झाला आहे. ही राम राज्याची सुरुवात आहे,” असं रवी किशन म्हणाले आहेत.

12:01 (IST) 10 Mar 2022
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघांमध्ये काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत.

11:50 (IST) 10 Mar 2022
दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशनची तयारी; मोदी होणार सहभागी

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील यामध्ये सहभागी होणार आहेत.

11:48 (IST) 10 Mar 2022
गोवा आणि युपीत ‘म्याव म्याव’ चा आवाज ऐकू आला नाही – नितेश राणे

उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “गोवा आणि युपीत 'म्याव म्याव' चा आवाज ऐकू आला नाही भाई, किती वाईट, मला फार दु:ख झालं,” असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

11:34 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशातील सर्व जागांचे कल हाती, भाजपा सर्वात मोठा पक्ष

उत्तर प्रदेशातील सर्व जागांचे कल हाती आले असून एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपा २६७ तर समाजवादी पक्ष १२५ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून बसपा आणि ते फक्त चार जागांवरच आघाडीवर आहेत.

11:23 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है – गिरीश महाजन

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

11:19 (IST) 10 Mar 2022
किशोर प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादव यांना टोला

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत अखिलेश यादव यांना टोला लगावला आहे. “नई हवा है। सपा सफ़ा है। बेवजह अखिलेश ख़फ़ा हैं!,” असं उपहासात्मकपणे ते म्हणाले आहेत.

11:16 (IST) 10 Mar 2022
“हिजाब तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय”

उत्तर प्रदेशात भाजपाचा विजय स्पष्ट दिसू लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेनशनला सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत विरोधकांना टोला लगावला आहे. 'हिजाब' तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय…चप्पा चप्पा भाजपा असं ट्वीट त्यांनी केलं आहे. #bjpwinningup असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.

11:12 (IST) 10 Mar 2022
जनतेने प्रियंका गांधींना नाकारलं, भाजपाची २४८ जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने जबरदस्त आघाडी घेतली आहे. भाजपा २४८ जागांवर पुढे असून बहुमताचा आकडा पार केला आहे. समाजवादी पक्ष १०१ तर काँग्रेस आणि बसपा फक्त ८ जागांवर आघाडीवर आहेत.

10:13 (IST) 10 Mar 2022
आपली लढाई आत्ता सुरु झाली आहे – प्रियंका गांधी

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे. नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला. उत्तर प्रदेशसहित मणिपूर, उत्तराखंड आणि कदाचित गोव्यातही भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडे सत्ता जाण्याची चिन्हं आहेत. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी)

10:08 (IST) 10 Mar 2022
योगी पुढे जाणार हे नक्की होतं – संजय राऊत

योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले आहेत.

10:05 (IST) 10 Mar 2022
पहिल्या फेरीतील मतमोजणीनंतर अखिलेश यादव आघाडीवर

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपाचे एसपी सिंग बघेल हे दुसऱ्या तर बसपाचे कुलदीप नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

10:00 (IST) 10 Mar 2022
रायबरेलीतून भाजपा उमेदवार अदिती सिंग आघाडीवर

काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या विद्यमान आमदार अदिती सिंग रायबरेलीतून आघाडीवर आहेत.

09:44 (IST) 10 Mar 2022
भाजपाने गाठला बहुमताचा आकडा

पोस्टल मतमोजणीनुसार भाजपा २०९ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात योगी सरकार येण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल.

09:41 (IST) 10 Mar 2022
१९८५ नंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी कायम राहणार योगी?

भाजपाला बहुमत मिळाल्यास योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी कायम राहतील हे स्पष्ट आहे. पण यानिमित्ताने अजून एक विक्रम योगी आदित्यनाथ यांच्या नावे होणार आहे. ते म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान ३७ वर्षानंतर त्यांना मिळणार आहे. राज्यात १९८५ नंतर जनतेने कोणत्याच पक्षाला दुसऱ्या वेळी सत्ता दिलेली नाही. १९८५ मध्ये काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मात्र कोणालाही हे जमलं नाही. जर योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे प्रमुख झाले तर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते पाचवे मुख्यमंत्री ठरतील.

09:36 (IST) 10 Mar 2022
योगी आदित्यनाथ इतिहास रचणार का?

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा एकदा सत्ता राखेल असा अंदाज आहे. असं झाल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील. कारण याआधी भाजपाचा एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवू शकलेला नाही. आतापर्यंत उत्तर प्रदेशात कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असून यापैकी कोणालाही दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याकडे नवा विक्रम करण्याची संधी आहे.

09:30 (IST) 10 Mar 2022
“विरोधक आधीच आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत आहेत”

उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी विरोधक आधीच आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत असल्याची टीका केली आहे. “ईव्हीएमच्या संशयास्पद हालचालींवर प्रशासन कारवाई करत असताना विरोधक विनाकारण गोंधळ घालत आहे. ते आधीच ईव्हीएमला पराभवासाठी जबाबदार धरत आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.

09:24 (IST) 10 Mar 2022
निवडणूक निकालाचा सेन्सेक्सवरही परिणाम

निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसत आहे. बाजार उघडतात सेन्सेक्समध्ये १२०० अंकाची वाढ पाहण्यास मिळाली आहे. निफ्टीदेखील १६,५७५ वर पोहोचला आहे.

09:21 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा १५० जागांवर आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने १५० जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पक्ष ८२ जागांवर आघाडीवर आहे.

09:07 (IST) 10 Mar 2022
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून आघाडीवर

पोस्टल मतमोजणीनुसार सुरुवातीच्या कलांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यदेखील त्यांचा मतदारसंघ सिरथूमधून आघाडीवर आहेत.

09:03 (IST) 10 Mar 2022
गौतम बुद्ध नगरमध्ये ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात

पोस्टल मतमोजणीनंतर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

08:47 (IST) 10 Mar 2022
अखिलेश यादव यांचं ट्विट

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं असून अजूनही आपल्या निर्धाराची परीक्षा राहिली असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विजयाचं प्रमाणपत्र घेऊन या असं आव्हान पक्षाचे नेते, उमेदवार यांना केलं आहे.

08:40 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतमोजणी सुरु

उत्तर प्रदेशात सकाळी ८ वाजल्यापासून सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे.

08:31 (IST) 10 Mar 2022
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जबरदस्त आघाडी, १०० हून अधिक जागांवर पुढे

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता असणाऱ्या भाजपाने सुरुवातीच्या कलांमध्ये जबरदस्त आघाडी घेतली आहे. भाजपा १०० हून अधिक जागांवर पुढे असून सपादेखील ५० च्या पुढे आहे,

08:27 (IST) 10 Mar 2022
भाजपा सरोजिनी मतदारसंघात १ लाख मतांनी जिंकेल, उमेदवाराचा दावा

लखनऊतील सरोजिनी नगर मतदारसंघातील भाजपा उमेदवार राजेश्वर सिंग यांनी पक्ष जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

“लोकांचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. भाजपा बहुमताने सरकार स्थापन करेल. मागील वेळेपेक्षाही जास्त जागा आम्ही जिंकू. सरोजिनी नगरमध्ये १ लाख मतांनी विजयी होऊ,” असं राजेश्वर सिंग म्हणाले आहेत.

08:21 (IST) 10 Mar 2022
वाराणसीत १४४ कलम लागू

मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदन केंद्रांवर गर्दी करत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वाराणसीत १४४ कलम लागू केलं आहे मतमोजणी संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं आहे.

08:11 (IST) 10 Mar 2022
उत्तर प्रदेशात भाजपा ३२ जागांवर आघाडीवर

मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपा ३२ जागांवर आघाडीवर आहे.

08:03 (IST) 10 Mar 2022
सरकारी यंत्रणेकडून मतदान यंत्रांची पळवापळवी- अखिलेश

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीत भाजपला मोठे यश मिळत असल्याच्या अंदाज व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी भाजप आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. राज्य सरकार हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे चोरत असून वाराणसीमध्ये अशा यंत्रांचा एक ट्रक पकडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मतदानोत्तर चाचण्या म्हणजे भाजपच विजयी होणार असल्याचा समज पसरविण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांची भाजपशी हातमिळवणी असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी अखिलेश यांचा आरोप फेटाळून लावला.

08:02 (IST) 10 Mar 2022
एग्झिट पोल काय सांगतायत?

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजप सत्ता राखेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी घट होईल, मात्र ४०३ सदस्यांच्या विधानसभेत जवळपास २४० जागांसह हा पक्ष बहुमत मिळवेल, असा अंदाज आहे. समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजपला जोरदार लढत दिली असून, हा सप आघाडी सुमारे दीडशे जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे संकेत या चाचण्यांतून मिळाले आहेत. बसप ५ ते १५ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून, काँग्रेसला कोणत्याही चाचणीत दोन अंकी जागा देण्यात आलेल्या नाहीत. (सविस्तर बातमी)

07:57 (IST) 10 Mar 2022
मतमोजणीत गडबड झाल्याचा ‘सपा’चा आरोप

मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला मतमोजणीचं लाइव्ह वेबकास्टिंग करण्याची मागणी केली. मतमोजणीचं थेट प्रक्षेपण पाहता यावं यासाठी ही मागणी केली. या वेबकास्टिंगची लिंक सर्व राजकीय पक्षांना देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. यापूर्वी वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपावर निवडणुकीच्या मतमोजणीत गडबड करण्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर सपाने या वेबकास्टींगची मागणी केलीय. मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. (सविस्तर बातमीसाठी)

उत्तर प्रदेश निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. भाजपाला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंग चौहान यांचाही समावेश होता. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताना योगी सरकारवर आपल्या समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला.

समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोक दल, भारतीय समाज पार्टी आणि अपना दल (क) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Up assembly election result 2022 live news updates in marathi sgy

First published on: 10-03-2022 at 07:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×