UP Election : ओवीसींची भाजपाविरोधात चाल! चार हिंदू उमेदवारांना उतरवलं मैदानात, ब्राह्मण व्यक्तीलाही दिलं तिकीट

ओवेसी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २७ उमेदवार उभे केले आहेत.

owaisi aimim given tickets 4 hindus

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी जवळपास निम्म्या जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) देखील उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. ओवेसी हे गेल्या अनेक महिन्यांपासून उत्तर प्रदेश आणि विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेत आहेत. सपा बसपाला मत देऊ नका, तर आम्हाला मतदान करा, असे आवाहन ओवेसी तिथल्या मुस्लिमांना करत आहेत.

ओवेसी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २७ उमेदवार उभे केले आहेत. यातील अनेक उमेदवार प्रभावी आहेत. एआयएमआयएम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुमारे ८० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर करू शकते, असे मानले जात आहे. या सर्व जागा मुस्लिम आणि दलित बहुसंख्य असणार आहेत.

असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिमा कट्टर मुस्लिम नेत्याची आहे, पण त्यांच्या पक्षाने यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीत आतापर्यंत जाहीर केलेल्या यादीत चार अशा उमेदवारांना तिकीट दिले आहे ज्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने कोणत्या जागांवर हिंदू उमेदवारांना तिकीट दिले आहे.

मेरठची हस्तिनापूर ही अनुसूचित जातीसाठीची जागा आहे आणि येथून एआयएमआयएमने विनोद जाटव यांना तिकीट दिले आहे. विनोद जाटव हे जाटव दलित समाजातून येतात. दुसरीकडे, हस्तिनापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाने योगेश वर्मा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, तर भाजपाने विद्यमान आमदार दिनेश खाटिक यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे, बसपने हस्तिनापूर मतदारसंघातून संजीव जाटव यांना तिकीट दिले आहे.

गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद मतदारसंघातून एआयएमआयएमने पंडित मदन मोहन झा यांना उमेदवारी दिली आहे. मदन मोहन झा हे ब्राह्मण समाजातील आहेत. भाजपाने साहिबाबादचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. सुनील कुमार शर्मा यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि संपूर्ण राज्यात सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा विक्रमही केला होता. दुसरीकडे बसपने अजित कुमार पाल यांना तर समाजवादी पक्षाने अमरपाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. अमरपाल शर्मा यांनी गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि विक्रमी फरकाने निवडणूक हरली होती.

एआयएमआयएमने मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा विधानसभा मतदारसंघातून भीम सिंह बल्यान यांना उमेदवारी दिली आहे. भीमसिंग बल्यान हे जाट समाजातून आले आहेत. बुढाणा विधानसभा जागेवर टिकैत कुटुंबाचाही प्रभाव आहे. बुढाणा विधानसभा मतदारसंघ हा जाटबहुल भाग असून येथे जाट समाजाची संख्या जास्त आहे.

सपा-आरएलडी युतीने या जागेवरून आरएलडीचे उमेदवार राजपाल बल्यान यांना उभे केले आहे, तर भाजपाने त्यांचे आमदार उमेश मलिक यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. बसपाने अनीस अल्वी यांना तर काँग्रेसने देवेंद्र कश्यप यांना उमेदवारी दिली आहे.

बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर मतदारसंघातून एआयएमआयएमने विकास श्रीवास्तव यांना उमेदवारी दिली आहे. विकास श्रीवास्तव कायस्थ समाजातून आलेले असून या निवडणुकीत ते एआयएमआयएमचे उमेदवार असतील. आतापर्यंत समाजवादी पक्ष आणि भाजपाने या जागेवरून उमेदवार जाहीर केलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसने येथून ज्ञानेंद्र शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up election 2022 owaisi aimim given tickets 4 hindus abn

Next Story
उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देण्यावरुन शिवसेनेमध्येच मतभेद? राऊतांच्या भूमिकेवर स्थानिक शिवसैनिक म्हणतात, “निवडून आल्यानंतर ते…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी