२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. या निकालांना जनादेश म्हणून घेत राजकीय पक्षांनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा विजय असे भाजपाने वर्णन केले आहे. त्याचवेळी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राकेश टिकैत यांनी ट्विट करून या निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीच्या महान उत्सवात जनतेचा निर्णय सर्वोपरि आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला. आम्हाला आशा आहे की स्थापन झालेली सर्व सरकारे आपापल्या राज्यात शेतकरी आणि मजुरांच्या उन्नतीसाठी काम करतील. विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन,” असे टिकैत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये सकाळपासून भाजपाने पूर्ण बहुमतासह भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. तर समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर काँग्रेसने बसपलाही मागे टाकले आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात मतदान पार पडले होते.

आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात योगी सरकार पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने परतणार आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील काही लोकप्रिय जागांचे निकाल येणे बाकी आहे. दरम्यान, प्रसिद्ध खतौली विधानसभा मतदारसंघाचे निकालही आले आहेत. ही जागा भाजपाच्या खात्यात गेली आहे. वास्तविक ही जागा शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या मूळ गावी असून त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपा सरकारवर भरपूर टीका केली होती.

या निवडणुकीत टिकैत यांनी भाजपच्या विरोधात मते मागितली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, खतौली विधानसभा जागेवर भाजपाच्या विक्रम सिंह यांना १००६५१ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले सपा-आरजेडी युतीचे राजपाल सिंह सैनी यांना केवळ ८४३०६ मते मिळाली आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सांगितले होते की, २०१३ मधील मुझफ्फरनगरमधील परिस्थिती आता बदलली आहे आणि येथे शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे यावेळचे निवडणूक निकाल वेगळे असतील.

दरम्यान, २०१२ ते २०१७ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने २०१७च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी केवळ ४७ जागा जिंकल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले होते. भाजपाने त्यावेळी ३१२ आणि मित्रपक्षांनी १३ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी बसपाला १९, काँग्रेसला ७ तर इतरांना पाच जागा मिळाल्या. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा विजय मिळाला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up election result 2022 rakesh tikait broke his silence on bjp victory abn
First published on: 10-03-2022 at 22:18 IST