UP Election: निवडणूक निकालानंतर काँग्रेस इतर पक्षांशी युती करणार का? प्रियंका गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

समाजवादी पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच राजकारण करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाशिवाय इतर कोणत्याही पक्षासोबत निवडणूकोत्तर युती करण्यासाठी पक्ष खुला असल्याचे म्हटले आहे. परंतु समाजवादी पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी लढत राहील आणि लोकांच्या प्रश्नांसाठी उभा राहणारा उत्तर प्रदेशातील प्रमुख पक्ष असेल.

“भाजपासाठी युतीचे दार बंद आहे, पण इतर पक्षांसाठी खुले आहे. समाजवादी पक्ष आणि भाजपा सारख्याच पद्धतीचे राजकारण करत आहेत कारण त्यांना अशा राजकारणाचा फायदा होत आहे. आमचा फायदा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत, असं आमचं म्हणणं आहे. जातीयवादाच्या आधारे पुढे जाणार्‍या पक्षांचा केवळ एक अजेंडा असतो. ते एकमेकांना फायदा करून देतात,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

त्यांना दोन्ही पक्षांमध्ये फरक दिसतो का असे विचारले असता, त्या म्हणाल्या की “जास्त फरक दिसत नाही.” तर निवडणुकांच्या मुद्द्यांवर बोलताना त्या म्हणाल्या, की “बेरोजगारी, महागाई, राज्यातील परिस्थिती आणि शेतकऱ्यांची स्थिती हे आमचे प्रमुख विरोधक आहेत आणि आम्ही त्यांच्याविरोधात लढू.”

“मी भविष्य सांगू शकत नाही. किती जागा मिळतील याचा अंदाज बांधणे किंवा भाकीत करणे अपरिपक्वता असेल. आमची लढाई आहे, ज्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. २०२२ च्या निवडणुकीने ती संपणार नाही. महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी आम्ही लढत राहणार आहोत, आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी उभा राहणारा युपीमधील प्रमुख पक्ष असणार आहोत. गेल्या दोन वर्षांत सातत्याने युपीमधील सर्व विरोधी पक्षांपैकी आम्हीच मुद्दे मांडत आहोत. इतर कोणत्याही पक्षाने ते केले नाही. आम्ही ते करत राहू, आम्ही लढत राहू,” असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ( Uttar-pradesh-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Open for post poll alliance with any party except bjp in uttar pradesh says priyanka gandhi hrc

Next Story
UP Election: उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी असणार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? स्वतः दिले संकेत, म्हणाल्या,…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी