उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान झालं. ही निवडणूक एकूण ७ टप्प्यांमध्ये होणार असून त्यासाठी १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर भारतातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य अशी उत्तर प्रदेशची ओळख असून त्यामुळेच हे राज्य आपल्या हाती ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून अनेक केंद्रीय मंत्री निवडणूक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अनुराग ठाकूर देखील उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करत असून वाराणसीत बोलताना त्यांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेस बिकिनी, हिजाब, राफेलवर बोलतो, पण..”

अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. विरोधकांकडून लोकांना आमिषं दाखवण्याचं राजकारण केलं जात असल्याचं ते म्हणाले. “काँग्रेस पक्ष बिकिनी, हिजाब, सीएए, राफेल या विषयांवर बोलतो. पण ते कधीही गरिबांच्या कल्याणाविषयी बोलत नाहीत. त्यांना फक्त राजकारणातून मतं कशी गोळा करायची हे माहिती आहे. तुम्ही लिहून घ्या, या निवडणुकीत अखिलेश यादव त्यांच्या मतदारसंघात पराभूत होणार आहेत”, असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

“संसदेलाही बनवले प्रचाराचा आखाडा ; लोकसभेत बोलताना मोदींच्या डोळ्यासमोर पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका”

“२०१४नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काही विरोधी पक्ष सातत्याने असं काहीतरी करतात ज्यात आंतरराष्ट्रीय संबंध असतात. मग ते राफेल असो, सीएए असो किंवा अजून कुठला मुद्दा असो. पण जनता असे दावे कधीही स्वीकारत नाही. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास ठेवते”, असं ते म्हणाले.

आरएलडीचे प्रमुख मतदान करणार नाहीत!

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये सपासोबत आघाडी केलेल्या आरएलडी अर्थात राष्ट्रीय लोक दल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी प्रचार करत असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात मतदानच केलं नाही. त्यावरही अनुराग ठाकूर यांनी टोला लगावला. “काही घराणेशाहीवादी लोक मतदान करत नाहीत. यातून त्यांची लोकशाहीविषयीची भूमिकाच दिसून येते”, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister anurag thakur slams akhilesh yadav congress up election campaign pmw
First published on: 11-02-2022 at 12:35 IST