लखनऊ : उत्तर  प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ८० विरुद्ध २० टक्के या दाव्याची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली. योगींना २० टक्के म्हणजे त्यांच्या बाजूने केवळ २० टक्केच नागरिक आहेत. त्यामुळे उर्वरित ८० टक्के लोकांचा समाजवादी पक्षाला पाठिंबा मिळेल, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केला.

भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य तसेच त्यांच्या इतर समर्थकांनी शुक्रवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. आदित्यनाथ यांनी नुकतेच एका मुलाखतीत ८० टक्के नागरिक भाजपच्या बाजूने असल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी योगींना लक्ष्य केले. तसेच भाजप तीनचतुर्थाश जागा जिंकेल, या दाव्याबाबत ते म्हणाले, भाजपला तीन ते चार असे म्हणायचे असेल, असा टोलाही अखिलेश यांनी लगावला.

उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजातील प्रमुख नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी बंडखोर मंत्री धरमसिंह सैनी तसेच भाजपचे पाच आमदार तसेच अपना दल (सोनेलाल) अमरसिंह चौधरी यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या भाजपच्या आमदारांमध्ये भगवती सागर, रोशनलाल वर्मा, विनय शाक्य, ब्रिजेश प्रजापती तसेच मुकेश वर्मा यांचा समावेश आहे.  भाजपचे हे आमदार मौर्य यांचे समर्थक आहेत.